युतीसाठी ‘पहले आप..पहले आप’
By Admin | Published: January 11, 2017 12:55 AM2017-01-11T00:55:07+5:302017-01-11T00:55:07+5:30
जि.प.निवडणूक : खडसेंच्या भूमिकेनंतर सेनेकडून प्रतिसादाची अपेक्षा
जळगाव : काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता घोषित होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कुरूक्षेत्र गाजविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपा युतीसाठी आपण आग्रही असल्याची भूमिका जाहीर केल्यानंतर शिवसेनेकडून प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्यातरी दोन्ही पक्षातील युतीबाबत ‘पहले आप..पहले आप’ अशी भूमिका आहे.
युतीला विरोध करणारे खडसे युतीसाठी आग्रही
शिवसेना व भाजपाची युती विधानसभा निवडणुकीत तुटली. भाजपाने निर्णय घेतल्यानंतर युती तोडायची घोषणा एकनाथराव खडसे यांनीच केली. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा मिळवित सत्ता संपादन केली. खडसे यांच्यावर भोसरी येथील भूखंड प्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. विधानसभेच्या वेळी युती तोडण्याची जबाबदारी स्वीकारणा:या एकनाथराव खडसे यांनीच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युतीसाठी पुढाकार घेतला आहे.
पारोळ्यात ए.टी.पाटलांचा पुढाकार
माजी मंत्री खडसे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर पारोळा व एरंडोल तालुक्याची जबाबदारी असलेल्या खासदार ए.टी.पाटील यांनी शिवसेना व भाजपा युतीसाठी पुढाकार घेत सेनेसोबत चर्चा सुरू केली आहे. सोमवारी झालेल्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान या विषयावर चर्चा होऊन सेनेने ही जबाबदारी माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यावर सोपविली आहे.
तुझं माझं जमेना अन् तुङयावाचून करमेना
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. गेले 20 वर्ष शिवसेनेने सत्तेचे लोणी चाखले. आरोपीच्या पिंज:यात मात्र भाजपाला ठेवले. असे सांगत स्वबळाचा नारा दिला. तिकडे शिवसेनेने देखील भाजपा शासनाच्या धोरणाविरोधात वेळोवेळी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतदेखील दोन्ही पक्षांनी स्वतंत्र चूल मांडली. त्यामुळे सध्यातरी शिवसेना व भाजपाचे ‘तुझं माझं जमेना अन् तुङया वाचून करमेना.’ अशी स्थिती आहे.
शक्तीस्थळांची दोघांकडून तपासणी
शिवसेना व भाजपाने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गट आणि गणातील शक्ती तपासली आहे. धरणगाव, पाचोरा, जळगाव ग्रामीण, चोपडा, भडगाव, एरंडोल, पारोळा या तालुक्यांमध्ये शिवसेनेसाठी पोषक वातावरण आहे. तर जामनेर, मुक्ताईनगर, यावल, चाळीसगाव, बोदवड या तालुक्यात भाजपा प्रबळ आहे. दोन्ही पक्षांकडून गट आणि गणांमधील आपली शक्ती तपासण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कमकमुवत बाजू आहे. त्या ठिकाणी युतीसाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
युती करण्याचे अधिकार हे आम्ही तालुकापातळीवर दिले आहेत. तालुकाध्यक्षांकडून प्रस्ताव आल्यानंतर तो राज्याला पाठविण्यात येऊन निर्णय घेण्यात येईल. धरणगाव, जळगाव ग्रामीण व पाचोरा तालुक्यात युती होणार नाही. सन्मापूर्वक वागणूक मिळणार असल्यास युतीसाठी प्रयत्न केले जातील.
-गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार युतीसाठी प्रयत्न केले जातील. मात्र शिवसेनेकडून अद्याप तसा कोणताही प्रस्ताव नाही. प्रेम हे दोन्ही बाजूने असावे. केवळ भाजपाने शिवसेनेवर प्रेम करून चालणार नाही. शिवसेनेने देखील होकार भरणे आवश्यक आहे.
-उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपा.