म्युकरमायकोसिसचे ४० इंजेक्शन वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:19 AM2021-05-25T04:19:45+5:302021-05-25T04:19:45+5:30
जिल्हा रुग्णालय : खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी नियोजन जळगाव : म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरिसिन बी या इंजेक्शच्या वाटपाचे नियंत्रण जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे ...
जिल्हा रुग्णालय : खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी नियोजन
जळगाव : म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरिसिन बी या इंजेक्शच्या वाटपाचे नियंत्रण जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे असून आलेल्या ७५ इंजेक्शनपैकी खासगीतील रुग्णांसाठी दोन दिवसांचे डोस असे ४० इंजेक्शन सोमवारी या ठिकाणाहून वाटप करण्यात आले. या इंजेक्शनची जेवढी मागणी झाली तेवढे वाटप करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व डॉ. उल्हास पाटील रुग्णालय या दोन रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार करण्याचे प्रशासनाकडून आदेश आहेत. त्यातच नॉन कोविड मात्र, म्युकरमायकोसिस असलेल्या रुग्णांचा मध्यंतरी या योजनेत नेमका उपचार कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला होता. आता अशा रुग्णासाठी जीएमसीतही एका कक्षाच्या हालचाली सुरू असून सीटू कक्षात काही दिवसात अशा रुग्णांची व्यवस्था होणार असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून या आजारावरील इंजेक्शच्या तुटवड्याचा विषय समोर आल्यानंतर आता. याचे नियंत्रण हे जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडे आहे. एका दिवशी प्रत्येकी दोन डोस असे या इंजेक्शनचे वाटप केले जाते. त्यानुसार २० जणांना ४० इंजेक्शन सोमवारी देण्यात आले. एका रुग्णाला ३० पेक्षा अधिक इंजेक्शन लागत असताना त्याचे वाटप मात्र अगदीच कमी प्रमाणात होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांसमोर इंजेक्शनची चिंता कायम असल्याचे चित्र आहे.
असे होतेय वाटप
डॉक्टरांची चिठ्ठी, आधारकार्ड आणल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरल्यानंतर हे इंजेक्शन या ठिकाणी उपलब्ध होत आहे. जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन मोफत असून योजनेबाहेरील रुग्णांना त्याचे शुल्क द्यावे लागते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.