७७९ कोटींचे जाऊ द्या हो, आधी खड्ड्यांमध्ये मुरुम टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 01:14 PM2019-07-08T13:14:08+5:302019-07-08T13:16:22+5:30
खराब रस्त्यांमुळे पाठ, मणक्याचा त्रास : मुरुम टाकण्याचा मुहूर्त केव्हा?
जळगाव : शहरात सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांची अक्षरश चाळणी झाली आहे. सर्वदूर चिखल पसरला आहे. तसेच खराब रस्ते व खड्डयामुळे वाहनधारकांना पाठ व कंबर दुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे ७७९ कोटींचा निधीतून काय कामे होतील ते करा मात्र, आधी खराब रस्त्यांमध्ये मुरुम टाका असेच जळगावकर म्हणत आहेत.
अमृत योजनेमुळे जळगावकरांना कधी नव्हे तेवढा त्रास यंदाच्या पावसाळ्यात सहन करावा लागत आहे. आधी रस्त्यांची पुर्णपुणे वाट लागलेली. त्यातच पाणी पुरवठा योजनेमुळे रस्ते खोदल्यानंतर त्या रस्त्यांची व्यवस्थित दुरुस्ती न झाल्यामुळे खोदण्यात आलेल्या भागाची सर्व माती रस्त्यावर पसरून चिखल तयार झाला आहे. चिखलाचा आधीच त्रास होत असताना त्यातच खराब रस्त्यांमध्ये तयार झालेल्या खड्डयांची भर पडली आहे. रायसोनी नगरात तर पायी चालणेही अवघड झालेले आहे. मोठमोठ्या खड्डयांमुळे वाहनेही फेऱ्याने न्यावी लागत आहे.
वाहनांचेही होत आहे नुकसान
खराब रस्त्यांमुळे व खड्डयामुळे केवळ माणसांच्या पाठीच्या मणक्यांचीच नाही तर दुचाकी व चारचाकी वाहनांचीही वाट लागत आहे. खड्डयांमुळे मोटारसायकलच्या टायर ट्यूबपासून कारच्या बॉडीपर्यंत अनेक पार्ट्स खराब होत आहेत. शॉकअप खराब होत आहे. तसेच चिखलामुळे वाहने अनेक ठिकाणी घसरत असल्याने लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. रिंगरोड, जिल्हाधिकारी निवासस्थानपुढील रस्ता, शिवाजी नगर या भागातील रस्त्ये मधोमध खोदल्यामुळे सर्वच रस्ते खराब झाले आहेत.
पावसानंतर धुलीकणांच्या प्रमाणात होते वाढ
पावसामुळे सध्या रस्त्यांवर चिखल पसरला आहे. तसेच पाऊस थांबल्यानंतर रस्ते कोरडे झाल्यांनंतर धुलीकणांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ असते. यामुळे देखील आरोग्यवर परिणाम होत असून, श्वसनाचे विकार मोठया प्रमाणात होतात.
तसेच अँलर्जी असणाºया रुणांना त्रास होतो. सर्दी, खोकला आणि डोळे चुरचुरणे आदींचा त्रास होऊ शकतो. तसेच धुळीमुळे त्वचेचे विकार होतात.
खचलेल्या रस्त्यांमुळे जास्त त्रास
‘लोकमत’ ने शहरातील काही पाहणी केली. अमृतमुळे खोदलेल्या ठिकाणी तात्पुरती माती टाकून केलेल्या दुरुस्तीमुळे अनेक ठिकाणी आता पावसामुुळे खोदलेला भाग मुख्य रस्त्यांपासून खोल गेला आहे. त्यामुळे एक ते दीड इंचापासून ४ ते ५ इंच खालीपर्यंतचे शेकडो खड्डे शहरात तयार झाले आहेत. तसेच या खड्डयामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डयांची खोली देखील वाहनधारकांना कळत नाही.
त्यामुळे वाहनधारकांना कंबरेपासून ते मानेपर्यंतच्या भागाला जोरदार झटका बसतो. कंबरेच्या वरील माकड हाड व पाठीचा मणका दाबला जाऊन मानेपर्यंत त्याच्या वेदना जाणवत आहेत. कधी कधी थेट मेंदूपर्यंत कळ जाते. हाडे ठिसूळ असलेल्या व्यक्तीला हा धक्का अतिशय वेदनादायी ठरतो.