निवेदन देण्यासाठी ‘हम पॉंच’ला मुभा! शासकीय कार्यालयात घोषणाबाजीला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 03:29 PM2023-03-14T15:29:44+5:302023-03-14T15:36:34+5:30
आंदोलनकर्त्यांना शासकीय कार्यालयात घोषणाबाजी करायलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विविध कार्यालय प्रमुखांना निवेदन देण्यासाठी होणाऱ्या गर्दीला आता लगाम बसणार आहे.
- कुंदन पाटील
जळगाव : जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार निवेदन देण्यासाठी आता पाच जणांनाच परवानगी असणार आहे. तसेच आंदोलनकर्त्यांना शासकीय कार्यालयात घोषणाबाजी करायलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विविध कार्यालय प्रमुखांना निवेदन देण्यासाठी होणाऱ्या गर्दीला आता लगाम बसणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयात अनेक जण, राजकीय संघटना, अराजकीय संघटना, मोर्चा काढून निवेदन देण्यासाठी येतात. कार्यालयासह परिसरात घोषणाबाजी करुन कार्यालयातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी एक परिपत्रक काढले असून याद्वारे निवेदन देण्याबाबत मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार संबंधित सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत.
अशी आहे संहिता
१) निवेदन देण्यापूर्वी एक दिवस आधी संबंधित पोलीस स्टेशन आणि संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाला एक दिवस आधी कळवावे लागणार आहे.
२) निवेदन देतांना मोर्च्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्याची जबाबदारी संबंधित पोलीस निरीक्षकाची असणार आहे.
३) मोर्चामधील केवळ ५ व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा राहील. मोर्चा काढून निवेदन देतांना शासकीय कार्यालयात शांतता ठेवणे आवश्यक राहील.
४) कार्यालयातील कर्मचाऱ्यांना, कार्यालयात उपस्थित नागरिकांना घोषणाबाजीमुळे त्रास होणार नाही, याबाबत संबंधितांना पूर्व यासंदर्भात सूचना द्यावी. तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटनांवर संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सूचित केले आहे.