उद्यापासून संपूर्ण व्यापार सुरू करण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:05+5:302021-05-31T04:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यात कोरोना संक्रमण संबंधित निर्बंध १ जूनपासून संपुष्टात येणार असून त्या दिवसापासून सर्वच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात कोरोना संक्रमण संबंधित निर्बंध १ जूनपासून संपुष्टात येणार असून त्या दिवसापासून सर्वच व्यापार पूर्ण वेळ सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेजारील सर्व राज्यांत सर्व प्रकारचे व्यापार सुरू असल्याने यापुढे महाराष्ट्रात बंद राहिल्यास आपल्या येथील व्यापार शेजारील राज्यात जाण्याची भीती आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. मागील दोन महिन्यांत बंदमुळे सर्व व्यापारी बंधूंचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे आता कोणतेही कडक निर्बंध न लावता १ जूनपासून कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करावा, अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे सरकारने सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
दोन महिने बंद काळात महानगरपालिका दुकानांचे भाडे, इतर कर, लाइट बिल, कर्जावरील व्याज माफ करून अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करून विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी राज्य कॅट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हा अध्यक्ष संजय शाह यांनी केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनादेखील दिली आहे.