प्रचारादरम्यान आकर्षण ठरलेल्या प्रेमवेड्या आजूचा असाही सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 03:09 PM2019-11-01T15:09:39+5:302019-11-01T15:11:51+5:30
आजू उर्फ अजय वाघ हा अशिक्षित तसेच थोडा भोळसर असलेला हा तरुण आमदार किशोर पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. विना मोबाइल कानावर हात ठेवत पाटील यांच्याशी साऱ्याच गप्पा तो मारतो. प्रचारा दरम्यान आजू एक आकर्षण होता.
प्रमोद ललवाणी
कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : प्रेम आंधळं असतं, असं म्हटलं जातं. तेदेखील तेवढंच खरं आहे. कारण आजू उर्फ अजय वाघ हा अशिक्षित तसेच थोडा भोळसर असलेला हा तरुण आमदार किशोर पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. विना मोबाइल कानावर हात ठेवत पाटील यांच्याशी साऱ्याच गप्पा तो मारतो. प्रचारा दरम्यान आजू एक आकर्षण होता. असा हा प्रेम वेडा किशोर पाटील यांच्या सत्काराला चक्क भडगावात पोहचला. मात्र पाटील यांनीच त्याला पेढा भरवत हृदयास लावले. या वेळी सारेच या प्रेमाप्रति भावनाप्रधान झाले नि आजूच्या प्रेमास सीमाच राहिली नाही आणि कजगावसह परिसरातील चाळीस खेड्यात आजूच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगतेय.
कजगाव येथील सतरा-अठरा वर्षे वयोगटातील एक युवक थोडा भोळसर आहे. मात्र प्रत्येकाला योग्यतेनुसार नमस्कार, जयभीम, जयहरी, जय जिनेंद्र, जयबाबाजी करत प्रत्येकाशी बोलणारा हा आजू वाघ जैन धर्मावर विशेष प्रेम करतो. जैन धर्माच्या गुरूंना घेण्यास जाणे, चातुर्मास दरम्यान प्रवचनास उपस्थिती तसेच इतरही धर्माबाबत विशेष आदर ठेवणारा हा आजू प्रत्येक लग्न समारंभास उपस्थित असतो. याबरोबरच कोणती जयंती असो वा कोणती मिरवणूक असो येथे आजूची उपस्थिती हमखास असतेच. याबरोबरच प्रत्येक अंत्यविधीस उपस्थिती ही हमखास असतेच. असा हा आजू गेल्या अनेक दिवसांपासून आमदार किशोर पाटील यांचा सच्चा कार्यकर्ता बनला आहे.
हातालाच मोबाइल समजणारा आजू
दिवसभरात हात कानावर ठेवत तो अनेकदा आमदार किशोर पाटील यांच्याशी बोलतो. मात्र हा सारा प्रकार पाहून नवीन लोक हे काय आहे करत पुढे जातात मात्र आजूचे विना मोबाइल संभाषण सुरूच रहाते. दरम्यान विधानसभा निवडणुकीत किशोर पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आजू कार्यकर्त्याबरोबर प्रचारात व्यस्त झाला नि आजू एक आकर्षण बनला. किशोर पाटील निवडून आल्यानंतर आजूच्या आनंदाला सीमाच राहिल्या नाहीत आणि मग कार्यकर्त्यांनी आजूला किशोर पाटील यांच्या भेटीस नेले. मात्र तेथे आमदार पाटील यांनीच आजू यास पेढा भरवत हृदयास लावत त्याचा सत्कार केला. याप्रसंगी सारेच उपस्थित भावनाविवश झाले अशा या सत्काराची चर्चा मात्र कजगावसह परिसरातील ४० खेड्यात चर्चिली जात आहे.