अमळनेरचे झाले ‘बिका’नेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 03:17 PM2019-04-15T15:17:18+5:302019-04-15T15:17:53+5:30
उमेदवार बाहेरचे : हाणामारीच्या घटनांचीही परंपरा
अमळनेर : संत सखाराम महाराजांची पुण्यभूमि , साने गुरुजींची कर्मभूमि , श्रीमंत प्रताप शेठ यांची दानभूमि आणि कधीकाळी क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळख असलेल्या अमळनेर शहराला काही दिवसांपूर्वी लागलेल्या ‘बिका’नेर या विशेषणानंतर नुकत्याच भाजप अंतर्गत झालेल्या राडयामुळे राजकीय नेत्यांची रणभूमी असे नवीन विशेषण लागले असून पुन्हा एकदा अमळनेर शहर राज्यात चर्चेत आले आहे.
कधीकाळी अमळनेरहून लंडनला जाणाऱ्या प्रताप मिलच्या सुती कपड्यामुळे म्हणा किंवा पटेल जर्दा असो किंवा प्रताप तत्वज्ञान केंद्र असो की जगप्रसिद्ध विप्रो कंपनीच्या ‘मदर युनिट’ मुळे किंवा अलीकडेच २० वर्षांपासून नावारूपाला आलेले मंगळदेव ग्रह मंदिर असो अमळनेरचे नाव नेहमी चर्चेत आणि अग्रेसर राहिले आहे. त्याचप्रमाणे राजकीय नेते व घडामोडींमुळे ही अग्रेसरच राहिले आहे.
राजकीय क्षेत्र सतत चर्चेत
खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून संपूर्ण राज्यात ओळख निर्माण झाली ती तत्कालीन जनता दलाचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यामुळे! अमळनेर म्हणजे आक्रमकता हे विशेषणही लागले. मुलाला शिवीगाळ केली म्हणून माजी नगराध्यक्ष गोविंद मुंदडा यांनी नवले नावाच्या पोलीस अधिकाºयाला पोलीस स्टेशनमध्येच खाली फेकले होते. त्याच गोविंद मुंदडा यांनी खान्देश शिक्षण मंडळाच्या चेअरमन पदाच्या निवडीच्या वादातून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यावर हात उचलला होता. ही राजकीय मारामारी चांगलीच रंगली होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बोगस मतदार आणले म्हणून अनिल भाईदास पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्या विरोधात केलेली तक्रार व वाद सोशल मीडियावर चांगलाच गाजला.
उमेदवार लादलेले
विधानसभा निवडणुकीत गेल्या अनेक वर्षात उमेदवार बाहेरचेच विजयी झाले आहेत. १९९५ च्या निवडणुकीत भाजपाने डॉ. बी.एस. पाटील यांना उमेदवारी दिली. ते बाहेरचे म्हणून चर्चाही झाली मात्र त्याचा फारसा परिणाम न होता ते विजयी झाले. ते तीन पंचवार्षिकमध्ये आमदार होते. त्यानंतर साहेबराव पाटील हे आमदार झाले. तेदेखील मुळचे पारोळा तालुक्यातील राजवड येथील. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील शिरीष चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळविला. पैसा खर्च करा व निवडून या असेच या मतदार संघाबाबत झाले असून ‘अमळनेरचे ‘बिका’नेर झाले असे विशेषण लावले जात आहे.
हाणामारीची परंपरा
नगरपालिका निवडणुकीत अनिल भाईदास पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांच्यात झालेल्या मारामारीने आणि दंगलीमुळे तोडफोड नुकसान होऊन राजकीय नेत्यांनी अमळनेर ला चर्चेत आणले. कार्यकर्त्यांमध्ये गलिच्छ राजकारणाची नशा चढली. अनेक दिवस तणावपूर्वक वातावरण होते. त्यादरम्यान अनिल भाईदास पाटील व माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यातील वैमनस्य, उदय वाघ व अनिल भाईदास पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष, तसेच वाघ व बी. एस. पाटील यांच्यातील संघर्ष भाजप च्या विधानसभा व पालिका पराभवाला कारणीभूत ठरला.