अमळनेर येथे मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीबाबत ठेवली झाकली मूठ सव्वा लाखाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 03:31 PM2019-08-23T15:31:01+5:302019-08-23T15:32:43+5:30
चौधरी व वाघ यांना आशीर्वाद आहेत का ? जनतेला विचारला सवाल
अमळनेर : निम्न तापी प्रकल्पाला १५०० कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे या भागात सिंचन वाढून शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे सांगत तुमचा जनादेश घ्यायला आलो आहे, तुमचा जनादेश आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागत सभेत केला. जनतेनेही मोठ्या आवाजात प्रतिसाद दिला
दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा अमळनेरात पोहचली. येथील फरशी पुलावर रमाबाई आंबेडकर चौकात सभेला सुरुवात झाली. वाहनावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी होते. रस्ते, जलयुक्त शिवार आदी कामांचा उल्लेख त्यांनी केला.
झाकली मूठ सव्वा लाखाची...
जनतेला आवाहन करताना आमदार शिरीष चौधरी व स्मिता वाघ यांना तुमचा आशीर्वाद आहे का, असा सवाल करीत विधानसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली. मुख्यमंत्री शिरीष चौधरींना जवळ करतात की स्मिता वाघ यांना, याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागले होते.
मुख्यमंत्र्यांचे पैलाड भागात आगमन झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात तसेच कळमसरे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम मंडळाने स्वागत केले. यावेळी पूरग्रस्तांसाठी अमळनेर टॅक्सी युनियन पदाधिकारी, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, भाजपच्या कविता जाधव यांनी मुख्यमंत्री निधीला मदत केली.
यावेळी व्यसपीठावर उदय वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, पंचायत समिती सभापती वजाताई भिल, बाजार समिती सभापती प्रफुल पवार, जिल्हा परिषद सदस्या मीना पाटील, संगीता भिल, माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील, माधुरी पाटील, शहराध्यक्ष शीतल देशमुख, भिकेश पाटील, महेश पाटील, महेंद्र बोरसे, रामभाऊ संदनशिव उपस्थित होते.
आणि साहेबरावांना विचारला सवाल...
तुमचा जनादेश आहे का, असे आवाहन जनतेला करत असताना गिरीश महाजनांनी फडणवीस यांच्या कानात काहीतरी सांगितले. त्यावर लागलीच त्यांनी स्मित हास्य करीत तुमचा जनादेश आहे का, असे साहेबरावांना जाहीरपणे विचारले. त्यावर त्यांनीही हसत होकार दिला.
पक्षातील गटबाजीचे दर्शन
यावेळी भाजपमध्ये गटबाजी असल्याचे स्पष्टपणे उघड झाले. उदय वाघ, पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील, माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांचे वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावण्याची जणू स्पर्धाच लागली होती. तर माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांचा स्वतंत्र गट पैलाड भागात स्वागताला उभा होता. त्यावेळी ठाकूर समाजाने त्यांना मागण्यांचे निवेदन दिले, पाडळसरे जनआंदोलन समितीने १५०० कोटी दिल्याबद्दल आभार मानले.