अमळनेर येथील विवाहात दिव्यांगांना आहेर देऊन दु:खावर घातली फुंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 03:40 PM2019-12-11T15:40:55+5:302019-12-11T15:43:34+5:30
शरीराच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लग्न समारंभात जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना लग्नात सन्मानाने बोलावून त्यांना आहेर देऊन त्यांच्या मनाला आनंद देण्याचे काम प्रा.जयश्री साळुंखे यांनी आपल्या कन्येच्या लग्नाच्या निमित्ताने केले आहे.
संजय पाटील
अमळनेर, जि. जळगाव : सर्वसाधारणपणे शरीराच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लग्न समारंभात जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग अशा १०० व्यक्तींना लग्नात सन्मानाने बोलावून त्यांना आहेर देऊन त्यांच्या मनाला आनंद देण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्या आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा.जयश्री साळुंखे यांनी आपल्या कन्येच्या लग्नाच्या निमित्ताने केले आहे. आदिवासी मंगलाष्टके प्रथमच म्हणण्यात आले.
प्रा.जयश्री साळुंखे यांची कन्या तनया हिच्या विवाहानिमित्ताने त्यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यासोबतच अशा आनंददायी सोहळ्याच्या आनंदापासून वंचित राहणाºया दिव्यांग व्यक्तींनाही आमंत्रित करून त्यांना आहेरचेदेखील वाटप केले. ममता मतिमंद विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना तसेच शहरातील ५० अपंग व्यक्तींना कपडे, डबे अशा वस्तू भेट स्वरूपात देण्यात आले. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदीच्या वेळीदेखील डीजेला फाटा देत साध्या पद्धतीने नृत्य ठेवण्यात आले होते.
प्रत्येक विवाहात पूजेसाठी गणपती ठेवला जातो. मात्र या विवाहाच्या माध्यमातून समाजसुधारक थोरपुरुषांची आणि त्यांच्या कार्याची ओळख सामान्य जनतेला व्हावी म्हणून जिजामाता, शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, शाहू महाराज, मदर तेरेसा, झाशीची राणी, बिरसा मुंडा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, बहिणाबाई, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, तुकाराम महाराज अशा अनेक थोरपुरुषांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.
मंगलाष्टकेदेखील आदिवासी सादर करण्यात आली. प्रथमच आदिवासी मंगलाष्टके तयार करून त्यांचा उपयोग या विवाहात करण्यात आला. वरातीतदेखील आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. अक्षता टाकल्याने कितीतरी तांदळाचे नुकसान होते म्हणून त्याऐवजी फुलांच्या पाकळ्या अक्षता म्हणून टाकण्यात आल्या. अशाप्रकारे विवाह समारंभातून सामाजिक कार्य आणि पारंपरिक अनावश्यक खर्चाला आळा घालून अन्नधान्याचीही नासाडी थांबवण्याची गरज असल्याचे या विवाह सोहळयात बोलून दाखवले. समाजाची दिशा बदलणारा, प्रेरणा देणारा हा विवाह सोहळा होता.