मारहाणीनंतर अवघ्या ३० मिनिटातच आटोपला अमळनेरचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:34 PM2019-04-11T12:34:21+5:302019-04-11T12:34:40+5:30
जळगाव - उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी मेळाव्यात केलेल्या मारहाणीनंतर मेळाव्याला सुरुवात झाली. यात गुलाबराव पाटील व गिरीश महाजन ...
जळगाव - उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी मेळाव्यात केलेल्या मारहाणीनंतर मेळाव्याला सुरुवात झाली. यात गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात वाघ दाम्पत्याला चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. अवघ्या ३० मिनिटात हा मेळावा आटोपण्यात आला.
अमळनेर येथील मेळाव्यात गोंधळ घालणाऱ्या काही कार्यकर्त्यांना तत्काळ मेळाव्याचा ठिकाणावरून बाहेर काढले. त्यानंतर उमेदवार उन्मेष पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचे आवाहन केले.
आमच्यावर जास्त अन्याय झाला, तरीही आम्ही प्रचारात - गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, भाजपाने आतापर्यंत शिवसेनेवर अनेक अन्याय केले आहेत. तरीही आम्ही आमच्या नेत्यांचा आदेशानंतर भाजपा उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झालो आहोत. कारण पक्ष व पक्षप्रमुख यांनी आम्ही केलेल्या कामासाठी पक्षाने नेहमीच पदे दिले आहेत. त्यामुळे एकावेळेसच पक्षाने नाकारले म्हणून अन्यायाची भावना मनात न ठेवता पक्षासाठी काम केले पाहिजे असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच भुसावळच्या सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भर सभेत राजेंद्र दायमा यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी दिलीप भोळे यांना उमेदवारी दिली. तरीही दायमा यांनी पक्षाचे काम केल्याची आठवण देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली.
भविष्यात देखील पक्षाकडून काही चांगलेच मिळणार - गिरीश महाजन
गिरीश महाजन म्हणाले की, या प्रकारे वाद घालून अन्याय किंवा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत नाही. पक्षाने आतापर्यंत आपण केलेल्या कार्याला नेहमीच न्याय व सन्मान दिला आहे. भविष्यात देखील आपल्याला पक्षाकडून नेहमीच चांगलेच मिळत राहील. यासाठी निराश नव्हता पक्षाचे काम करणे गरजेचे असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.