अमळनेर साने गुरुजी शिक्षक पतपेढी नोकर भरती प्रकरणी 'जैसे थे'चे न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 12:40 PM2020-12-12T12:40:37+5:302020-12-12T12:41:23+5:30
साने गुरुजी शिक्षक पतपेढी नोकर भरती प्रकरणी 'जैसे थे'चे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अमळनेर : येथील पूज्य सानेगुरुजी शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या नोकर भरतीबाबत सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश आर. एस. शेख यांनी १७ डिसेंबरपर्यंत 'जैसे थे'चे आदेश दिल्याने भरती प्रक्रिया थांबली आहे.
दीपक रामकृष्ण पाटील हे अमळनेर सानेगुरुजी पतपेढीत कर्मचारी होते. त्यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवून त्यांना परस्पर कामावरून कमी करण्यात आले होते. त्या दरम्यान पतपेढीला कर्मचारी सूची मंजूर झाली असून, नवीन कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र दीपक पाटील यांच्या नावावर तत्कालीन संचालक मंडळाने बनावट कर्ज दाखवले. तसेच कोणताही गैरव्यवहार केल्याचे लेखा परीक्षणात आढळून आले नाही. तसेच अपहाराबाबत दीपक पाटील यांच्याविरुद्ध पोलिसातदेखील तक्रार नाही. उलट पक्षी तत्कालीन संचालक मंडळाने अपहार केला असून, ते दडपण्यासाठी खोटा आरोप लावून नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. कर्मचारी भरतीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, असा दावा त्यांनी ऍड.उमेश पवार यांच्यामार्फत सहकार न्यायालयात दाखल केला असता न्यायालयाने पतपेढीला ११ रोजी आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. पतपेढीतर्फे रवींद्र दगडू पाटील यांनी मुदतवाढीसाठी अर्ज दिला असता न्यायालयाने १७ डिसेंबर ही सुनावणीची तारीख ठेवली आहे. तोपर्यंत 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिल्याने भरती प्रक्रिया थांबली आहे.