अमळनेर तहसीलदारांनी वाळू वाहतूकदारांची केली कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 09:23 PM2020-10-08T21:23:54+5:302020-10-08T21:26:33+5:30
बोरी नदीकडून येणाऱ्या सर्व वाटा जेसीबीने खोदून तहसीलदारांनी वाळू माफियांची गोची केली आहे.
संजय पाटील
अमळनेर : खबरींमुळे चोरटी वाळू वाहतूक नियंत्रित होत नसल्याने तहसीलदारांनी बोरी नदीकडून येणाऱ्या सर्व वाटा जेसीबीने खोदून वाळू माफियांची गोची केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतूकदारांनी हैदोस माजवला होता. सुसाट धावणाºया टेम्पोंनी कहर केला होता. मध्यरात्री, पहाटे वेगाने आवाज करत नागरिकांचा निद्रानाश केला जात होता. तक्रार करणाºया नागरिकांना दादागिरी करणे, शनिवार, रविवार सुटीचा दिवस पाहून नदी पात्रातून वाळू चोरण्याचे प्रमाण वाढले होते.
तहसीलदारांच्या घरावर पाळत ठेवून पथक पोहोचण्यापूर्वी वाळू तस्करांनी पगारावर ठेवलेले खबरी वाळू वाहतूकदारांना माहिती पुरवून कारवाईपासून वाचवत होते. अधिकारी जळगावला बैठकीला अथवा व्हिडीओ कॉन्फरन्स मिटींगला गेले, अशी माहिती वाळू चोरांपर्यंत पोहचविले जाते आणि त्या काळात सर्रास वाळू वाहतूक केली जात होती.
ट्रॅक्टर व टेम्पोच्या कर्कश आवाजामुळे पिंपळे रोड, एलआयसी कॉलनी, समर्थ नगर, बहादरपूर रोड, झामी चौक भागातील अनेक नागरिकांना निद्रानाशाचा त्रास होऊन त्यांच्या कौटुंबिक आरोग्यावर परिणाम झाले आहेत. याबाबत ओरड होती आणि महसूल कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला जात होता. म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे.
बोरी नदी पात्रातून ठरावीक मार्गाने दोन्ही काठावरून ट्रॅक्टर व टेम्पो अथवा बैलगाडीच्या साहाय्याने अवैध वाळू वाहतूक व्हायची. त्याच मार्गावर जेसीबी मशीन लावून खड्डे खोदून ठेवले. त्यामुळे कोणतेच वाहन नदी पात्रात जाऊ शकत नाही व नदी पात्रातून बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे वाळू वाहतूकदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. दोन दिवसांपासून बºयापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. नागरिकांनीदेखील याबाबत समाधान व्यक्त केले आहे.