अमळनेरचा मृत्यू दर शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 02:28 AM2021-05-14T02:28:47+5:302021-05-14T02:29:38+5:30
पॉझिटिव्हीटी एक टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे.
संजय पाटील
अमळनेर : तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 1 टक्क्यांपेक्षा खाली आली असून गेल्या तीन दिवसांपासून मृत्यू दर शून्यावर आला आहे. शासकीय कोविड केयर व कोविड हेल्थ सेंटर बंद करण्यात आल्याने तालुक्याला सुखद धक्का बसला आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताच प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी लोकसहभागातून इंदिराभुवन येथे 70 खाटांचे कोविड हेल्थ सेंटर सुरू केले होते तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड केयर सेंटर सुरू करण्यात आले होते. टेस्टिंग ,ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीमुळे रुग्णसंख्या खालावली गुरुवारी रुग्णसंख्या 1 टक्क्यांपेक्षा कमी आली. 641 पैकी 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय रुग्णालयात फक्त 18 ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. त्यामुळे इंदिराभुवन मधील कोविड केयर सेंटर सोमवार पासून बंद करण्यात आले तर गुरुवार पासून आंबेडकर वसतिगृहातील कोविड केयर सेंटर बंद करण्यात आले आहे दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर , परिचारिका ,कर्मचारी यांचा उपयोग लसीकरणासाठी करण्यात येणार असून जास्त लस उपलब्ध झाल्यास अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात येईल असे अधीक्षक डॉ प्रकाश ताडे यांनी सांगितले. रुग्णांची संख्या वाढल्यास यंत्रणा साहित्यासह उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गुरुवारी इतर 10 कोविड सेंटरला फक्त 79 रुग्ण होते तर 193 बेड रिक्त होते.