अमळनेरच्या लेकीच्या तत्परतेने अवघ्या २ सेकंदासाठी तो बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 07:15 PM2020-12-28T19:15:46+5:302020-12-28T19:17:32+5:30
अमळनेरची लेक महाराष्ट्र सुरक्षा बलाची जवान...क्षणात जीवाचा आकांत करून धावली....‘ट्रॅक’वर उडी मारली...तेवढ्यात समोरून लोकल धावत आली ... लोकल थांबवून तिने त्याचे प्राण वाचवले.
संजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : शनिवार रोजी सकाळची साडेनऊ वाजेची वेळ होती. मुंबईच्या ग्रांटरोड रेल्वे स्थानकावर फारशी गर्दी नव्हती...एक गृहस्थ येरझाऱ्या मारत होता....अचानक चक्कर आली....प्लॅटफॉर्म वरून सरळ रेल्वे ट्रॅकमध्ये जाऊन पडला...तिकडून लोकल येत होती....वेळ चुकताच त्याचे प्राण जाणार, हे निश्चित होते....अमळनेरची लेक महाराष्ट्र सुरक्षा बलाची जवान...क्षणात जीवाचा आकांत करून धावली....‘ट्रॅक’वर उडी मारली...तेवढ्यात समोरून लोकल धावत आली ... लोकल थांबवून तिने त्याचे प्राण वाचवले. अगदी दोन सेकंदाचा उशीर झाला असता तर त्याचे प्राण गेले असते..
लता विनोद बन्सोले ही अमळनेरच्या पिंपळे रोड वरील द्वारका नगरमधील रहिवाशी. तिचे वडील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. आपल्या वडिलांकडून कर्तव्यात तत्परतेचे आणि प्रमाणिकतेचे धडे तिने घेतले आणि त्याची प्रचिती शनिवारी सकाळी आली. ग्रांट रोड स्टेशनवर लोकल ट्रेनने जाण्यासाठी चर्च गेट ते कैझाड इराणी उभे होते. अचानक चक्कर आल्याने ते रेल्वे रुळावरच पडले. ही बाब महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिला जवान लता बन्सोले हिच्या लक्षात आली. समोरून लोकल येत असल्याचे तिला दिसले. क्षणाचाही विलंब न लावता ती धावत सुटली.
ट्रॅकवर उडी मारली. तोच लोकल जवळ येऊन पोहचली होती. तिच्या इशाऱ्याने इंजिन द्रायव्हरच्या लक्षात आले की, काही तरी गडबड आहे. त्याने गाडी थांबवली. लताने आपले सहकारी कैलासचंद्र मोके व प्रवाशांच्या मदतीने कैझाडला बाहेर काढून स्थानिक दवाखान्यात उपचार केले आणि त्याची विचारपूस करून त्याला टॅक्सीने घरी पोहचविले. ही घटना ग्रांट रोड रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. अमळनेरच्या लेकीने दाखवलेले धाडस आणि तिच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.