अमळनेरची सहा जणांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2017 12:53 AM2017-01-11T00:53:34+5:302017-01-11T00:53:34+5:30
कर्जबाजारी झाल्याने ते फेडण्यासाठी अमळनेर येथील सहा जणांनी डॉ.निखिल बहुगुणे यांच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते.
जळगाव : उद्योग व भिशीतून कर्जबाजारी झाल्याने ते फेडण्यासाठी अमळनेर येथील सहा जणांनी डॉ.निखिल बहुगुणे यांच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात दिवसात या टोळीचा पर्दाफाश केला असून अमळनेर शहरात रात्रभर धाडसत्र राबवून सहा जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यापैकी एकाला बडोदा (गुजरात) येथून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या टोळीने बनावट कागदपत्राच्या आधारावर मोबाइल सीम कार्ड मिळविल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
गेल्या आठवडय़ात 3 जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता अमळनेर शहरातील ग्लोबल स्कूलजवळून डॉ.निखिल बहुगुणे यांच्या पार्थ या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. अपहरणकत्र्यानी पार्थला कारमध्ये कोंबून डॉ.बहुगुणे यांच्याकडे मुलाच्या सुटकेसाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. महेश विनायक खांजोडकर (बारी) वय 33, त्याचा भाऊ सुनील विनायक बारी (वय 36 दोन्ही रा.बालाजीपुरा,अमळनेर), भरत दशरथ महाजन (वय 24 रा.शिवम नगर, अमळनेर), भटू हिरामण बारी (मूळ रा.अमळनेर ह.मु.बडोदा, गुजरात) व अनिल नाना भिल (वय 20, रा.बहादरपूर रोड, अमळनेर) या सहा जणांनी पार्थचे अपहरण केले होते.
पोलीस ठार मारतील या चर्चेनेच सोडले पार्थला
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल, सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांच्यासह पथकाला अमळनेरात रवाना केले होते. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली होती.
अपहरणकर्ते सापडले तर सोडायचे नाही, थेट गोळ्याच झाडायच्या अशी चर्चा काही पोलिसांमध्ये सुरू असताना ते शब्द शहरात पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवणा:या मुख्य सूत्रधार महेश याने ऐकले अन् त्याचा थरकाप उडाला. त्याने तातडीने सहका:यांशी संपर्क साधून पार्थला आहे त्या ठिकाणी सोडून देण्याचे सांगितले. त्यामुळे या पाच जणांनी अमळगाव येथे रात्री दीड वाजता सोडून पळ काढला होता.
पथकाला दहा हजारांचे बक्षीस
पार्थची सुखरूप सुटका व आरोपींच्या अटकेत यश आल्याने सुपेकर यांनी तपास पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यात पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल,सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे, विजय पाटील, दिलीप येवले, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, शशिकांत पाटील, अशोक चौधरी, रमेश चौधरी, नरेंद्र वारुळे, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, दिनेश बडगुजर, प्रकाश महाजन, जयंत चौधरी, विनोद पाटील, विलास पाटील, प्रदीप पाटील यांचा समावेश आहे.