रुग्णालयातील हेळसांडमुळे अमलवाडीच्या रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:15 AM2021-04-06T04:15:03+5:302021-04-06T04:15:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चोपडा तालुक्यातील अमलवाडी येथील प्रदीप पावरा यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चोपडा तालुक्यातील अमलवाडी येथील प्रदीप पावरा यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातील हेळसांड व त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने, शिवाय आरोग्य यंत्रणेत कुठलेच सहकार्य न मिळाल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप पावरा यांचे चिरंजीव अजय पावरा यांनी केला आहे. याबाबत राज्यपालांकडे तक्रार करीत सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतला होता. अखेर दुपारी सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.
२९ मार्च रोजी श्वास घ्यायला त्रास होत असल्याने प्रदीप पावरा यांना लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथून चोपडा येथे जाण्यास सांगितले. रुग्णवाहिका न दिल्याने २२ किमी मोटारसायकलवर वडिलांना घेऊन गेल्यानंतर डॉ. मनोज पाटील यांनी तपासणी करून जळगाव येथे रुग्णवाहिका देऊन पाठविले. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विनविण्या करूनही दाखल करून घेतले नाही. खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने ३० रोजी पुन्हा जिल्हाधिकारी यांना सांगितल्यानंतर जीएमसीत अतिदक्षता विभागात वडिलांना दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणच्या कक्ष सेवकांने वडिलांना पाणीही दिले नाही व पाणी देणारही नाही, असा दम भरला. २ एप्रिल रोजी अचानक वडिलांना पीएनसी कक्षात दाखल करण्यात आले. आम्हाला कसलीही कल्पना न देता, तिथे जाऊन बघितले असता वडिलांना झटके आले होेते व ते विव्हळत होते. आम्ही लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांना कळविल्यानंतर त्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना घेऊन आल्या. तेव्हा वडिलांना प्रचंड त्रास होत होता. ते बराच वेळ खाली पडून होते, कोणीच आले नाही, असे शेजारील रुग्णांनी सांगितले. वडिलांना पुन्हा अतिदक्षता विभागात दाखल केले मात्र, त्यांचा मृत्यू झाला. असे अजय पावरा यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. दरम्यान, दुपारी रुग्णालयाने सीसीटीव्ही फुटेज दिल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली.
गंभीर आरोप करीत पोलिसांत दिली तक्रार
आम्ही आदिवासी समाजाचे व पेसा भागातील गरीब असल्याने माझ्या वडिलांवर उपचारादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करताना प्रचंड हेडसांळ झाली. यामुळे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे, संबंधित कर्मचारी व डॉक्टर ज्यांनी उपचारादरम्यान दुर्लक्ष केले त्यांची चौकशी करावी व दोषीवर तत्काळ अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी अजय पावरा यांनी केली असून त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे.