अद्भुत खगोलीय घटना, जळगावच्या नभांगणात धुमकेतू सदृष्य दृष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:28 PM2020-02-20T12:28:57+5:302020-02-20T12:29:21+5:30
निघाले मात्र चीनचे २ डी लाँग मार्च रॉकेट
विलास बारी
जळगाव : पूर्व क्षितीजावर बुधवारी पहाटे एक अनपेक्षित दृष्य नजरेस पडले. धुमकेतू जात असल्याचे दृष्य आकाशात दिसत असताना प्रत्यक्ष ते चीनने पाठविलेले २ डी लाँग मार्च नावाचे रॉकेट असल्याचे खगोल अभ्यासक सतीश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
बुधवारी पहाटे ४.४५ वाजता पूर्व क्षितीजावर एक चमत्कारिक दृष्य दिसले. अतिशय अनपेक्षित असलेल्या या दृष्यात धुमकेतू जात असल्याचे दिसत होते. मात्र हे सारे होत असताना स्फोट होणारे तारे मात्र दिसत नव्हते. त्यामुळे नेमका धुमकेतू आहे किंवा अन्य काय? अशी उत्सुकता निर्माण झाली. धुमकेतू सदृष्य असणारे दृष्य वृश्चिक राशीकडून गुरुग्रहाकडे जात होते. या दरम्यान काही वेळेनंतर पहाट होऊ लागल्याने चंद्र कोरीच्या प्रकाशात ते अद्भुत दृष्य दिसेनासे झाले.
वायूमंडळाशी संपर्कामुळे पेट
या यानाने पृथ्वीची गुरुत्वाकर्षण सिमा ओलांडल्यानंतर त्या यानाला जोडलेले बुस्टर रॉकेट मुख्य रॉकेटपासून अलग झाल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने वायूमंडळाशी त्याचे घर्षण झाले. त्यामुळे त्याने पेट घेतल्याने असे दृष्य तयार झाले.
२ डी रॉकेट बाबत गुप्तता
चीनने हे रॉकेट झिचॅग उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून सोडले आहे. या लाँग मार्च २ डी रॉकेटमध्ये काय सोडण्यात आले आहे याबाबत मात्र चीनने गुप्तता पाळली आहे.
काय आहे लाँग मार्च रॉकेट
लाँग मार्च रॉकेट नावाने चीन एक रॉकेटस्ची मालिकाच सोडत आहे. त्याला एलएम या नावाने संबोधले जात आहे. चँग झेंग असे चिनी भाषेमध्ये त्याला म्हटले जाते.
धुमकेतू की उपग्रह प्रक्षेपण यान?
पुर्वेकडे जात असलेले हे दृष्य दिसेनासे झाल्यानंतर खगोल अभ्यासक सतीश पाटील यांनी याबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर चीन या देशाने पहाटे ४.०५ वाजता एक २ डी लाँग मार्च नावाचे रॉकेट प्रक्षेपित केल्याची माहिती उपलब्ध झाली.
सकाळी ४.४५ वाजता हे अद्भुत दृष्य पहायला मिळाले. त्यानंतर मित्र जे.पी.वानखेडे यांच्या मदतीने फोटो काढले. अधिक माहिती घेतल्यानंतर चीनने लाँग मार्च २ डी या अंतर्गत सोडलेले रॉकेट असल्याचे स्पष्ट झाले. चीनने या मध्ये काय सोडले याबाबत मात्र गुप्तता पाळली आहे.
-सतीश पाटील, खगोल अभ्यासक,जळगाव.