नेरीनाका ते जिल्हा रुग्णालयादरम्यान रुग्णवाहिकेची वाट खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:16 AM2021-01-20T04:16:50+5:302021-01-20T04:16:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेलाही मोठी कसरत करावी लागत असल्याचे गंभीर चित्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेलाही मोठी कसरत करावी लागत असल्याचे गंभीर चित्र जळगावच्या रस्त्यावर आहे. अजिंठा चौफुली ते रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यात नेरीनाक्यापासून वाहतूक कोंडी, खड्डे यांचा सामना करीत ही खडतर वाट पार करून रुग्णालयात पोहोचवावे लागत आहे. ही वाट गंभीर रुग्णांच्या जिवावर बेतण्याची गंभीर चिन्हे आहेत.
नेरी नाका भागात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच झाली आहे. या ठिकाणी कधी वाहतूक पोलीस असतात; तर कधी नसतात. कधी काळी वाहतूक पोलीस उपस्थित असल्यास रुग्णवाहिकेचा हॉर्न ऐकू आला तरच वाट मोकळी करून दिली जाते. अन्यथा या रस्त्यावर रुग्णवाहिकेलाही बराच वेळ ताटकळावे लागत असल्याचे गंभीर चित्र वारंवार समोर येत आहे. रुग्णवाहिका चालकांसाठीही हा रस्ता अत्यंत डोकेदुखीचा ठरत आहे. मध्यंतरी मलनिस्सारण योजनेच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थती या रस्त्यावर झाली होती. अत्यंत अरुंद रस्त्यावर दोनही बाजूंनी वाहनांची वर्दळ असल्याने पांडे चौकापर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिकेला खूपच वेळ लागत असल्याचे गंभीर चित्र आहे.
असा होता प्रवास
एक रुग्णवाहिका दुपारी अजिंठा चौफुलीवरून निघाली होती. नेरी नाक्यापर्यंत केवळ काहीच ठिकाणी अडथळे आले. मात्र, रस्ता मोकळा होता. मात्र, नेरी नाका ते पांडे डेअरी चौकापर्यंत रुग्णवाहिकेला अधिक वेळ लागला. पांडे चौकात पुन्हा चारीही बाजूंनी वाहने असल्याने रुग्णवाहिका थोडी हळू झाली. नंतर पुन्हा वळण घेऊन ती रुग्णालयाकडे वळली. नेरी नाका ते पांडे डेअरी चौकापर्यंतचे खड्डेही जीवघेणे ठरू शकतात, अशी स्थिती आहे.
कोट
रुग्णवाहिका नेत असताना अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. नेरी नाका, पांडे डेअरी चौक हा रस्ता सर्वांत खडतर वाटतो. रुग्णवाहिका चालकांसमोर रुग्णाला रुग्णालयात वेळेवर पोहोचविण्याचे आव्हान असते. एका जिवाचा हा प्रश्न असतो. मात्र, ही वाट बिकट असते. अनेक वेळा वाहतूक पोलीस वाट मोकळी करून देतात; पण काही वेळा वाट मिळत नाही.
- कवी कासार, रुग्णवाहिका सुपरवायझर
कोट
आपल्याकडे क्वचित एखादी व्यक्ती रुग्णवाहिकेची वाट अडवत असेल. मात्र, त्या मानाने वाहतुकीची कोंडी तेवढी नाही. शिवाय सर्वच जण रुग्णवाहिकेला वाट करून देत असतात. वाहतूक पोलीस नेहमीच अशा वेळी रस्ता मोकळा करतात.
- देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
१.२२ वा
अजिंठा चौफुली
१.४६ वा.
शासकीय रुग्णालय
२.१
कि. मी. अंतर
२४
मिनिटे वेळ
दंड नाहीच?
वाहतुकीची कोंडी कमी असणे आणि शक्यतोवर कुणीच रुग्णवाहिकेचा रस्ता अडवत नाही, म्हणून अशा केसेस अगदी क्वचितच असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेचा रस्ता अडविल्याप्रकरणात कोणालाही दंड ठोठावण्यात आलेला नसल्याची माहिती आहे.