जळगावात गर्भवती, प्रसूत महिलांसाठी रुग्णवाहिकांना मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:35 PM2018-05-07T12:35:46+5:302018-05-07T12:35:46+5:30
१०२ क्रमांकाची सेवा कागदावरच
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ७ - गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात हलविणे तसेच प्रसूत महिलांना घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळावी म्हणून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ‘१०२’ या क्रमांकावर वारंवार संपर्क साधूनही उत्तर मिळत नाही. त्यामुळे गरजू रुग्णांना याचा लाभ मिळत नसून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करण्यासह प्रचंड त्रासही सहन करावा लागत असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या स्टिंग आॅपरेशद्वारे उघड झाले आहे.
ग्रामीण भागात आजही घरी प्रसूती करण्याचे प्रमाण अधिक असल्याने ते बऱ्याचवेळा महिला अथवा नवजात बाळाच्या जिवावर बेतते. घरी होणाºया या प्रसूतीचे प्रमाण टाळले जावे तसेच बाल व माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने रुग्णालयांमध्येच प्रसूती व्हावी, यासाठी कोठूनही संपर्क साधून रुग्णवाहिका मिळावी म्हणून १०२ या स्वतंत्र क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मुंबई येथून त्या-त्या भागातील कॉल सेंटरला याची माहिती देऊन रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचविली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून १०२ ही सुविधा बंद असल्याचा रुग्णांना अनुभव येत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
जिल्हा रुग्णालयात ताटकळली होती महिला
यावल तालुक्यातील किनगाव येथील एका २७ वर्षीय महिलेला प्रसूतीसाठी गेल्या महिन्यात जिल्हा रुग्णालायात दाखल केले होते. प्रसूतीनंतर १३ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातून या महिलेला घरी नेण्यासाठी १०२ क्रमांकावर वारंवार संपर्क साधला. मात्र वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर खाजगी रुग्णवाहिका करून संध्याकाळी सहा वाजता या महिलेला घरी नेण्यात आले होते. यामुळे तब्बल सात ही महिला व नवजात बालक जिल्हा रुग्णालयात ताटकळले होते. त्यानंतरही वारंवार गर्भवती व प्रसूत महिलांच्या नातेवाईकांना असे अनुभव येऊ लागल्याने या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने रविवार, ६ मे रोजी या संदर्भात दिवसभरवारंवार या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र कधी फोन लागलाच नाही तर कधी रिंग वाजत असली असती तिकडून प्रतिसाद मिळत नव्हता.
दररोज २० ते २५ प्रसूती
जळगाव जिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी २० ते २५ प्रसूती होतात. या महिलांना येथे येण्यासाठी संपर्क न झाल्याने त्यांना या सेवेचा फायदा मिळू शकत नाही. त्यामुळे आरोग्य विभाग, राज्य शासनाने या बाबत तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
१०२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आलेले अनुभव
दुपारी १.१५ वाजता
दुपारी १.१५ वाजता १०२ क्रमांकावर संपर्क साधला असता दूरध्वनी व्यस्त असल्याचा टोन ऐकू येत होता. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन वेळा या क्रमांकावर संपर्क साधला असता असाच अनुभव आला.
दुपारी २.१० वाजता
दुपारी १.१५ वाजता संपर्क होऊ शकला नाही म्हणून दुपारी २.१० वाजता पुन्हा हा क्रमांक लावला असता त्या वेळी हा क्रमांक व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा.. असा संदेश ऐकू येत होता.
दुपारी ४ वाजता
पुन्हा दुपारी ४ वाजता संपर्क साधला असता त्या वेळी १०२ क्रमांकावर पूर्ण बेल वाजली मात्र यावेळी कोणीही प्रतिसाद दिला नाही.
दुपारी ४.५५ वाजता
दुपारी ४.५५ वाजता पुन्हा संपर्क साधला असता त्या वेळीही प्रतिसाद मिळाला नाही. या वेळी एका पाठोपाठ तीन ते चार वेळा पुन्हा पुन्हा संपर्क केला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही.