अमित पाटील यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 07:19 PM2020-12-17T19:19:40+5:302020-12-17T19:20:31+5:30
वीर जवान अमित साहेबराव पाटील यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे वाकडी येथे पोहचत असून सकाळी ९.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : वीर जवान अमित साहेबराव पाटील यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे वाकडी येथे पोहचत असून सकाळी ९.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान गुरुवारी वाकडी येथे अमित पाटील यांच्याच रोकडे रस्त्यालगतच्या शेतात.अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली आहे.
अमित पाटील हे पुंछ सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलातील सैनिक म्हणून तैनात होते. २७ नोव्हेंबर रोजी कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हिमनगाचा भाग कोसळल्याने त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. यानंतर त्यांना पुंछ येथील सैनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथे चार दिवस उपचार केल्यानंतर जम्मुच्या सैनिक रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले. १९ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेरीस १५ रोजी त्यांची मृत्यूसोबत सुरु असलेली लढाई थांबली. मृत्यूने अमित पाटील यांच्यावर मात केली. पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्युची बातमी कुटूंबियांना कळविल्यानंतर संपूर्ण वाकडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
लष्करी इतमामात आज अखेरचा प्रणाम
वीर जवान अमित पाटील यांचे पार्थिव गुरुवारी दिल्लीहून इंदोर येथे आणण्यात आले. तेथून रात्रीचा प्रवास करीत शुक्रवारी वाकडी येथे पोहचणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यावेळी शासनाच्यावतीनेही मानवंदना दिली जाणार असल्याची माहिती तहसिलदार अमोल मोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
ReplyForward |