नेरीच्या महामॅरेथॉन स्पर्धेत अमोल खैरे ठरला विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:49 PM2017-12-23T16:49:30+5:302017-12-23T17:07:44+5:30
जामनेर तालुक्यातील २५ शाळांमधील ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग
आॅनलाईन लोकमत
नेरी, ता.जामनेर,दि.२३ : जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत आयोजित अमृत महामॅरेथॉनमध्ये तालुक्याभरातील ७०० विद्यार्थ्यांसह अधिकारी व पदाधिकाºयांनी सहभाग घेतला. सात किलोमीटरच्या महामॅरेथॉन मध्ये अमोल खैरे हा विजेता ठरला.
स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जामनेर पंचायत समितीच्या सभापती सुनंदा पिठोडे, सातपुडा आॅटोमोबाईल्सचे किरण बच्छाव, जामनेरचे तहसीलदार नामदेव टिळेकर, नायब तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, प्रशांत देशमुख, विवेक पाटील, विक्रांत सराफ यांच्या उपस्थितीत झाला.
शनिवारी सकाळी ७ वाजता स्पर्धेला सुरवात झाली. तालुक्याभरातील २५ विद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉनमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तहसीलदार नामदेव टिळेकर, नायब तहसीलदार परमेश्वर कासुळे, किरण बच्छाव, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक जण धावपट्टीवर उतरले होते.
प्रथम विजेत्या स्पर्धकास रोख बक्षीस
स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता अमोल जनार्दन खैरे (राणीदानजी जैन विद्यालय वाकोद) याला रोख ४ हजार रुपये, द्वितीय विजेता सुशील सुभाष जंजीरे- (न्यू इंग्लिश स्कूल, बेटावद) याला ३ हजार, तृतीय विजेता अजय भागवत धनगर- (जनता हायस्कूल, नेरी) याला २ हजार, चतुर्थ विजेता राहुल विष्णू पवार- (गरुड विद्यालय, शेंदुर्णी) याला एक हजार, पाचवा विजेता हिरालाल किशोर बडगुजर- (ललवाणी विद्यालय, शेंदुर्णी) ७५० रुपये, सहावे बक्षीस जीवन समाधान लव्हाळे- (नि.पं.पाटील विद्यालय, पळासखेडा मीराचे) ५०० रुपये व स्मृतीचिन्ह असे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
स्पर्धेसाठी पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रवींद्र पाटील, बी.पी.पाटील, महामॅरेथॉन स्पर्धा समिती, क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले.