टंचाई उपाययोजनांमध्ये ४० टक्के गावे अमळनेर, पारोळा तालुक्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:21+5:302021-04-12T04:14:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदा वरुणराजाने जिल्ह्यावर कृपा केली असली तरी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये अमळनेर तालुक्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदा वरुणराजाने जिल्ह्यावर कृपा केली असली तरी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये अमळनेर तालुक्यातील ८० गावे तर पारोळा तालुक्यातील ७७ गावांचा समावेश आहे. जिल्ह्याचा एकूण आराखडा पाहता ४० टक्के गावे या दोन्ही तालुक्यातीलच आहे. त्यामुळे दमदार पाऊस होऊनही या तालुक्यांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात की काय असे चित्र सध्या आहे. जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांपैकी ३८ टक्के उपाययोजना या दोनच तालुक्यांमध्ये आहे.
जिल्ह्यावर सलग दुसऱ्या वर्षी वरूणराजाची कृपा राहिल्याने संभाव्य पाणीटंचाई आराखड्यातील उपाययोजनांवरील खर्चात कपात होऊ शकली. त्यामुळे यंदाचा टंचाई आराखडा दोन कोटी तीन लाख १८ हजार रुपयांवर आला आहे. असे असले तरी अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावांवर टंचाईचे सावट आहे. उपाययोजनांवरील एकूण खर्चापैकी ७० लाख ९० हजार रुपयांची तरतूद या दोन्ही तालुक्यांसाठी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस होऊन पावसाने सरासरी ओलांडली. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी पार केली होती. त्यामुळे नद्या, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले आहे. नद्या, तलावांना पाणी असल्याने टंचाई आराखड्यातील तरतूद घटू शकली. मात्र तरीदेखील वाढत्या उन्हाची तीव्रता पाहता जिल्ह्यात टंचाई उद्भवण्याची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये विहीर, कूपनलिका, प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण, विहिरी खोलीकरण, अशा १५ तालुक्यांमध्ये एकूण ४१७ योजनांद्वारे दोन कोटी तीन लाख १८ हजार रुपये खर्च करून टंचाई निवारण केले जाणार आहे.
अमळनेर, पारोळा तालुक्यात ३८ टक्के योजना
टंचाई निवारणार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये प्रत्येक तालुक्याची आकडेवारी पाहिली असता अमळनेर व पारोळा तालुक्यात एकूण योजनांपैकी ३७.६४ टक्के योजना राबविल्या जाणार आहे यावरूनच या दोन्ही तालुक्यांच्या टंचाईचा अंदाज येऊ शकतो. सर्वाधिक योजना अमळनेर तालुक्यात राबविल्या जाणार आहे. येथे ४० लाख २० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल पारोळा तालुक्यात ७८ योजनांद्वारे ३० लाख ७० हजार, तर धरणगाव तालुक्यात ६८ योजनांद्वारे ३१ लाख २० हजार रुपये खर्च करून टंचाई निवारणार्थ उपाययोजना केल्या जाणार आहे.
तालुकानिहाय गावे, योजनांची संख्या व खर्च
तालुका--- गावांची संख्या ---- योजना संख्या--- खर्च
अमळनेर---८०--- ८०---४०.२०
भडगाव---८---८---१.९२
भुसावळ---४---४---११.०८
बोदवड---१४---१५---७.७६
चाळीसगाव ---४५---४५--- १९.८०
चोपडा ---२४---२४---१३.१२
धरणगाव---४८---६८--- ३१.२०
एरंडोल---७---७--- २.५२
जळगाव---७---१७--- ९.२८
जामनेर---१६---१६--- ५.७६
मुक्ताईनगर ---१७---१७---९.२०
पाचोरा ---२५---२५---११.४०
पारोळा ---७७---७८--- ३०.७०
रावेर ---५--- ५---२.९२
यावल---८---८--- ६.३२