कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहात अमरावतीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By विजय.सैतवाल | Published: September 12, 2024 12:47 AM2024-09-12T00:47:22+5:302024-09-12T00:47:43+5:30

ही धक्कादायक घटना बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

Amravati Student suicide in Poet Bahinabai Choudhary North Maharashtra University boys hostel | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहात अमरावतीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहात अमरावतीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या


जळगाव : दोन दिवसांपूर्वीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहमध्ये दाखल झालेल्या प्रतीक विजयराव गोरडे (१९, रा. शिरसगाव कसबा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) या विद्यार्थ्याने खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

विद्यापीठात बी. टेक (प्लास्टिक) प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला प्रतीक गोरडे विद्यापीठामध्ये मुलांचे वस्तीगृह क्रमांक तीन येथे खोली क्रमांक टी ४४७ मध्ये दोनच दिवसांपूर्वी राहायला आला होता. त्याच्या खोलीमध्ये पाच सहकारी राहतात. बुधवारी (११ सप्टेंबर) विद्यार्थ्यांनी वस्तीगृहात गणपतीची आरती केली. त्यानंतर जेवण केले. काही वेळानंतर विद्यार्थी वस्तीगृहातील खोलीकडे परतले त्यावेळी प्रतीकच्या खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. काही जणांनी खिडकीचा काच फोडून पाहिले तर प्रतीकने गळफास घेतलेला होता. विद्यार्थ्यांनी त्याला खाली उतरवून विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेतून  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

 विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सारंग, सुरक्षा निरीक्षक यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तसेच रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

मुलाला सोडताना आई-वडिलांना अश्रू अनावर 
दोन दिवसांपूर्वी विद्यापीठात प्रतीकला सोडण्यासाठी त्याचे आई-वडीलदेखील आले होते. मुलाला येथे पोहोचवल्यानंतर परतत असताना त्यांना व प्रतीकलादेखील अश्रू अनावर झाले होते. आई-वडील घरी जाऊन दोन दिवस होत नाही तोच विद्यार्थ्याने आपले जीवन संपविले. 

सकाळी साहित्य खरेदी 
विद्यापीठातील वस्तीगृहाच्या खोलीमध्ये राहण्यासाठी प्रतीकने बुधवारी सकाळी गादी व इतर साहित्य खरेदी केल्याची माहिती मिळाली. दिवसभर सर्व व्यवस्थित असताना रात्री त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला हे समजू शकले नाही.

Web Title: Amravati Student suicide in Poet Bahinabai Choudhary North Maharashtra University boys hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.