अमृताहुनी गोड नाम तुझे देवा...... स्वर संगीताने निनादले जळगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:54 AM2020-01-04T11:54:09+5:302020-01-04T11:54:49+5:30
बालगंधर्व संगीत महोत्सवाचे उदघाटन
जळगाव : स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या १८व्या बालगंधर्व संगीत मोहतासावाला शुक्रवारी संध्याकाळी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सुरुवात झाली. या वेळी सादर शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने तसेच तालबद्ध संगीताने शहर निनादले.
डॉ. अपर्णा भट व त्यांच्या शिष्यगणांनी कथक नृत्य, गुरुवंदना व सरस्वती वंदना, तर स्थानिक कलाकारांच्या साथीने स्वर्गीय वसंतराव चांदोरकर दिग्दर्शित व स्वर्गीय शशिकांत राजदेरकर रचित ‘संगीत कथा सांगते व्यथा सुरांची’ या नाटकातील नांदी ‘हे नमना शिवशंकरा’ ही अतिशय शिस्तबद्ध आणि सुरेल स्वरात सादर करण्यात आली.
मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन
खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपाला आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवास ३ जानेवारी रोजी थाटात प्रारंभ झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद््घाटन झाले. या महोत्सवाच्या उद््घाटन समारंभास आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जळगाव जनता बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, भवरलाल व कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका निशा जैन, स्टेट बँक आॅफ इंडियाचे अशोक सोनवणे, राजेश गाडगीळ, युनियन बँक आॅफ इंडियाचे मनोज कुमार, राजेश घाडगे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पु. ग. अभ्यंकर, उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे हे उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रसिकांची मोठी उपस्थिती होती.
पहिल्या दिवसाच्या प्रथम सत्रात मुंबई येथील सारेगमप लिटिल चँप मुग्धा वैशंपायन यांनी ‘मला खेळायला’, ‘वारी जाऊ रे सावरिया कोणते वारू नारे’चे बोल असलेल्या श्री रागाने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यानंतर छोटा खयाल रमसिया दर्शन व रघुनंदन रात आवत है ही द्रुत तीन तालातील बंदिश सादर केली. त्यानंतर ‘जय-जय गौरीशंकर’ नाटकातील नाट्यपदे ‘सोहम हर डमरू बाजे’ व त्यानंतर ‘पद्मनाभा नारायणा’ सुरेश हळदणकर यांनी गायलेली गीत सादर केले. त्यापाठोपाठ ‘श्रीरंगा कमलाकांता’ हे होनाजी बाळा नाटकातील पद सादर करण्यासह ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे कानडी भजन सादर केले. या सोबतच ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ हा नामदेवांचा अभंग सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. मुग्धा वैशंपायन यांना रूपक वझे, हर्षल काटदरे, सुरज बारी, श्रुती वैद्य यांनी सातसंगत केली.
द्वितीय सत्रात मुंबई येथील सारेगमप फेम विजेता विश्वजीत बोरवणकर यांनी राग पुरिया कल्याण बडा ख्याल तिलवाडामध्ये ‘आज शोभन दृत’ तीन तालात बंदिश ‘पिहरवा आजा’ त्यानंतर तराना संगीतबद्ध करून जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेले ‘अभीर गुलाल उधळीत रंगत्या’ने मने जिंकली. त्यानंतर श्रीनिवास खळे यांचा अभंग ‘काळ देहासी कट्यार काळजात घुसली’, ‘सुरत पिया बिन’ पारंपरिक रचना सादर करून ‘सावरे आई जैयो भैरवी बाजे मुरलिया बाजे’ अशा रचनांनी रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगगाने शास्त्रीय संगीताची सांगता झाली.
महोत्सवात आज कथ्थकसह तबला व पखवाजची जुगलबंदी
महोत्सवाच्या दुसºया दिवशी ४ रोजी प्रथम सत्रात बनारस येथील विशाल कृष्ण यांचा कथ्थकचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर द्वितीय सत्रात पंडित प्रतापराव पाटील व शुभ महाराज यांच्या तबला व पखवाजची जुगलबंदी शहरवासीयांना अनुभवता येणार आहे. संध्याकाळी सात वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात हे कार्यक्रम होणार आहेत.