खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 'अमृत' योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:44 IST2024-01-18T18:44:07+5:302024-01-18T18:44:53+5:30
जळगाव येथे बुधवारी (दि.१७) समाजातील मान्यवर व लाभार्थ्यांसोबत बैठक, विविध प्रशासकीय अधिकार्यांशी चर्चा आदींचे आयोजन करण्यात आले होते.

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 'अमृत' योजना
जळगाव : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही विभाग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा आर्थिक दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या विविध योजनांची माहिती जळगावात देण्यात आली.
जळगाव येथे बुधवारी (दि.१७) समाजातील मान्यवर व लाभार्थ्यांसोबत बैठक, विविध प्रशासकीय अधिकार्यांशी चर्चा आदींचे आयोजन करण्यात आले होते. 'अमृत' हा राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे, या संस्थेच्या लाभार्थ्यांनी संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे व आपली उन्नती करावी, विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊन स्वतंत्र अर्ज दाखल करावेत, असे आवाहन 'अमृत' संस्थेचे अधिकारी व जळगाव, धुळे-नंदूरबार जिल्ह्यांचे पालक अधिकारी हरिष भामरे यांनी केले.
माहितीसाठी संकेतस्थळ उपलब्ध
खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्या लाभार्थ्यांना सरकारच्या इतर संस्था, महामंडळ अथवा योजनांचा लाभ मिळत नाही, अशा लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेत असताना अधिक माहितीसाठी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे, असेही भामरे यांनी सांगितले. याप्रसंगी द्वारकाधीश जोशी,विभागीय समन्वयक दीपक जोशी, जळगाव जिल्हा समन्वयक राजेंद्र कानडे, शामकात कलभंडे, कमलाकर फडणीस, नीलेश राव, उदय खेडकर, प्रविण कुलकर्णी, अशोक वाघ आदींसह जळगाव, भुसावळ, फैजपूर येथील लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
‘अमृत’मध्ये या आहेत योजना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, आर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, स्वयंरोजगारासाठी या घटकाला प्रोत्साहन देणे व लघुउद्योग निर्मितीस चालना देणे, कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे आदी 'अमृत'च्या योजना आहेत.