जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार केळी उत्पादकांच्या खात्यावर पडणार ३७८ कोटींची रक्कम!
By Ajay.patil | Published: November 3, 2023 07:09 PM2023-11-03T19:09:34+5:302023-11-03T19:09:49+5:30
जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार केळी उत्पादकांच्या खात्यावर पडणार ३७८ कोटींची रक्कम!
जळगाव - हवामानावर आधारीत फळ पीक विम्याच्या दोन महिन्यांपासून प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. केळीच्या नुकसानभरपाईची वाट पाहत असलेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अखेर गोड होणार असून, आठवडाभरात जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३७८ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम पडणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे.
हवामानावर आधारीत फळ पीक विम्याची रक्कम दर वर्षाला १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडते. यावर्षी मात्र, विमा कंपनीने केळी उत्पादकांच्या केळी लागवड क्षेत्राच्या पडताळणीचा घाट घातल्यामुळे १५ सप्टेंबरची मुदत संपल्यावर देखील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरभाईची रक्कम पडलेली नव्हती. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील यांचा पाठपुरावा सुरु होता. दिवाळीच्या आधी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर केळी पीक विम्याची रक्कम पडणार आहे.
५३ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३७८ कोटींची भरपाई..
जिल्ह्यातील ७७ हजार ८३२ केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी कमी ५३ हजार ९५१ केळी उत्पादक शेतकरी केळी पीक विम्यासाठी पात्र आहेत. कमी व जास्त तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ८६ महसूल मंडळांपैकी ५५ महसूल मंडळं पात्र ठरली होती. गेल्या वर्षी लागवड झालेल्या केळीच्या लागवड क्षेत्राबाबत विमा कंपनीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्राची पडताळणी देखील करण्यात आली. पडताळणीनंतर जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ केळी उत्पादक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले आहेत.
केळी पीक विम्याच्या प्रलंबित विषयाबाबत पाठपुरावा सुरु होता. गुरुवारी पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी यांच्यासोबत चर्चा झाली. जिल्ह्यातील ५३ हजार ९५१ केळी उत्पादक पीक विम्यासाठी पात्र ठरले असून, आठवडाभरात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची ३७८ कोटी ३० लाखांची रक्कम पडणार आहे. यासाठी कोणतीही पडताळणी होणार नाही. तसेच प्रलंबित शेतकऱ्यांचाही प्रश्नाबाबत पाठपुरावा सुरु आहे.
- उन्मेष पाटील, खासदार