बिथरलेला बैल छतावरून कोसळून गंभीर जखमी, ऐन पोळ्याच्या दिवशी वावडदा येथील घटना
By सागर दुबे | Published: August 26, 2022 09:23 PM2022-08-26T21:23:12+5:302022-08-26T21:23:27+5:30
पोळा सणानिमित्त वावडदा येथील शेतकरी सुधाकर रतन राजपूत हे शुक्रवारी दुपारी त्यांच्या मालकीचा बैल घेऊन गोपाळवाडा भागातून जात होते.
जळगाव : तालुक्यातील वावडदा येथे बैलपोळा साजरा होत असताना एक बिथरलेला बैल थेट घराच्या छतावर चढून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, बैलावर उपचार करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
पोळा सणानिमित्त वावडदा येथील शेतकरी सुधाकर रतन राजपूत हे शुक्रवारी दुपारी त्यांच्या मालकीचा बैल घेऊन गोपाळवाडा भागातून जात होते. त्यावेळी अचानक बैल बिथरला आणि तो एका घराच्या जिन्यावरून छतावर चढला. राजपूत यांनी बैलाला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिथरलेला बैला थेट छतावरून खाली कोसळला. शिंगाला ईजा झाल्यामुळे बैल गंभीर जखमी झाला. रक्तस्त्राव होत असल्यामुळे बैलावर तातडीने उपचार करण्यात आले. दरम्यान, बैलाची प्रकृती स्थिर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, घटनास्थळी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती.