ईदसाठी मूळगावी गेलेल्या कुटूंबाच्या घरात चोरट्यांचा डल्ला
By सागर दुबे | Published: April 26, 2023 03:57 PM2023-04-26T15:57:21+5:302023-04-26T15:57:33+5:30
सोन्याच्या दागिन्यांसह संसारपयोगी वस्तू लंपास
जळगाव : ईद सणानिमित्त धुळे येथे मूळगावी गेलेल्या मकबूल शहा दगू शहा यांच्या गेंदालाल मिलमधील बंद घरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारून सोन्याच्या दागिन्यांसह संसारपयोगी वस्तू लांबविली. ही घटना मंगळवारी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे धुळे येथील मकबूल शहा हे गेंदालाल मिलमध्ये कुटूंबियांसह भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. ईद सणानिमित्त ते कुटूंबियांसह २० एप्रिल रोजी धुळे येथे मूळगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर कुलूप बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये डल्ला मारला. मंगळवारी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास शहा हे कुटूंबियांसह धुळे येथून घरी परतले. तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. तर लहान मुलाची सोन्याची अंगठी, सोन्याचे मंगळसूत्र, ७ हजार रूपयांची रोकड, इलेक्ट्रीक शेगडी, पाण्याची मोटार, घरातील भांडे असा एकूण १९ हजार ५०० रूपयांची ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेजारच्यांची पाण्याची मोटार लांबविली
शहा यांना त्यांच्या शेजारी राहणारे शशिकांत तायडे यांचे घर सुध्दा उघडे दिसले. ही बाब त्यांनी तायडे यांना सांगितली. त्यांनी लागलीच घर गाठून पाहणी केल्यानंतर १ हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटार चोरीला गेल्याचे दिसून आले. दरम्यान, घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून पुढील तपास विजय निकुंभ करीत आहेत.