भुसावळात ‘आनंदितां’कडून सप्तसुरांची उधळण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:51 PM2018-01-08T23:51:22+5:302018-01-08T23:53:51+5:30
सहजयोग परिवारातर्फे सहज संगीताची मैफल
आॅनलाईन लोकमत
भुसावळ , दि.८ : परमपूज्य माताजी श्री निर्मलादेवी प्रणीत सहजयोग परिवारातर्फेे कोलंबियातील विश्वविख्यात गायिका आनंदिता बासू यांच्या सहज संगीत मैफलीने सप्तसुरांची उधळण करीत रसिकसाधकांना जिंकून घेतले.
बियाणी हायस्कूलच्या प्रांगणात ही मैफल झाली. या निमित्ताने सहजयोग परिवाराव्दारे शोभायात्रा काढण्यात आली होती. मराठी पध्दतीने पारंपारिक पोशाख घालून साधकांनी सवाद्य मिरवणूक काढली.
सायंकाळी आनंदिता बासु यांची भक्तीमय सूरप्रस्तुती साधकांना चैतन्यमय करुन गेली. आनंदिता यांना भुसावळच्या मैफलीत त्यांचे पती अन्द्रेस, तबला वादक संदीप दलाल (अमरावती), हार्माेनियम वादक मिलींद दलाल(पुणे) व ढोलकी वादक शुभम अनेरिया (देवास,म.प्र.)यांनी संगीतसाथ दिली.
प्रारंभी श्री गणरायाला वंदन, श्रीकृष्णांना वंदन यावर भक्ती रचनांची प्रस्तुती झाली. 'ब्रम्ह शोधिले ब्रम्हांड मिळाले' या भक्ती गिताने रसिक मंत्रमुग्ध झालेत. सहज संगीत आणि ध्यानाचा संबंध हा आनंदिता बासू यांनी विशद केला. त्याच बरोबर उपस्थित असलेल्या हजारोंच्या संख्येने आलेल्या साधकांना त्यांनी आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्रदान केली. त्यानंतर सूफी संगीताचे सादरीकरण झाले.'ओ लाल मेरी' या सूफी संगितावरती संपूर्ण प्रांगण आनंदात न्हाऊन निघाले. यावेळी आमदार संजय सावकारे व नगरसेवक मनोज बियाणी सपत्नीक उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्नील धायडे यांनी केले. प्रा.प्रशांत रेवागड,उमेश नेरकर,चेतन पाटील,महेश कुलकर्णी यांनी आभार मानले.