अन् चाळीसगावी गरजला ‘म. गांधी की जय’चा गजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:34 PM2020-10-01T17:34:19+5:302020-10-01T17:35:53+5:30
म.गांधीजी की जय! अशा गगनभेदी गर्जनेने संपूर्ण रेल्वेस्टेशनचा परिसर दणाणून गेला. बापूजींचे चाळीसगाववासीयांनी जंगी स्वागत केले.
जिजाबराव वाघ ।
चाळीसगाव : प्रसंग ९३ वर्षांपूर्वीचा असला तरी अजूनही चाळीसगावकरांच्या सन्मानाचा मानबिंदूच आहे. १६ फेब्रुवारी १९२७च्या पहाटे महात्मा गांधी यांचे नागपूर एक्सप्रेसने चाळीसगावच्या रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. म.गांधीजी की जय! अशा गगनभेदी गर्जनेने संपूर्ण रेल्वेस्टेशनचा परिसर दणाणून गेला. बापूजींचे चाळीसगाववासीयांनी जंगी स्वागत केले. पुढे त्यांच्या स्मृती चिरंतन जपताना जुन्या न.पा. इमारती नजीकच्या परिसराला म. गांधी चौक. असे नाव दिले. हा चौक म्हणजे त्यांच्या स्मृतींची दीपमाळचं! म. गांधी यांच्या चाळीसगाव भेटीचा प्रसंग ज्येष्ठ नागरिकांच्या चर्चेत अधून-मधून येतो.
म.गांधींनी आपल्या आयुष्यात भारत भ्रमंती केली होती. खेडी स्वयंपूर्ण व्हावी, असा त्यांचा आग्रह असायचा. ग्रामीण परिसरातील नागरिकांनी स्वावलंबी व्हावे, असे ते नेहमी सांगत. खेड्यातील जनतेचा स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग असावा. यासाठीही बापूजी दौरे करीत. चाळीसगावी झालेले त्यांचे आगमन याच जनजागृतीसाठी होते. त्यामुळे चाळीसगावच्या ऐतिहासिक पानांवर म.गांधीजी यांच्या भेटीचा रोमांचकारी क्षण सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलाय. गेली अनेक वर्ष बापूजींच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्ताने त्याला उजाळा मिळतो. चाळीसगावकरांचा ऊर अभिमानाने भरुन येतो.
बापूजींना दिले 'खादी'वर रेखाटलेले मानपत्र
म.गांधी यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर नगरशेट स्व.नारायण बुंदेलखंडी हे गावातील प्रमुख मंडळींसह हजर होते. पुष्पहार घालून बापूजींचे स्वागत केले गेले.
सकाळी साडेआठ वाजता लक्ष्मीनारायण मंदिरासमोर लोकमान्य टिळक चौकात म.गांधीजी यांची जाहीर सभा झाली.
सभेत बापूजींना विशेष प्रिय असलेल्या खादीवर तांबड्या शाईने रेखाटलेले मानपत्र अर्पण करण्यात आले. मानपत्राचे वाचन नारायण बुंदेलखंडी यांनी केले. यावेळी ५६० रुपयांची थैलीदेखील बापूजींना अर्पण करण्यात आली.
खादी चळवळ म्हणजे गोरगरिबांना आधार
चाळीसगावकरांच्या प्रेमाने बापूजी भारावून गेले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी खादी चळवळ का सुरू केली याचे विवेचन केले. ‘खादी चळवळ म्हणजे गोरगरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होय.’ अशा शब्दात खादीचे महत्व विशद केले. जनतेने खादी वापरावी, असे आवाहन त्यांनी केले. बापूजींचा प्रत्येक शब्द चाळीसगाववासी जीवाचा कान करून ऐकत होते. अखेरीस भारत माता की जय! अशी गर्जना करीत बापूजींनी भाषण थांबविले.
चाळीसगावकरांचा खादी खरेदीला प्रतिसाद
बापूजींच्या भाषणाने प्रभावित झालेल्या चाळीसगावकरांनी सभा संपताच खादी खरेदीसाठी गर्दी केली. अवघ्या अर्ध्या तासात २०० रुपयांच्या खादी कापडाची विक्री झाली. खादी खरेदीचा प्रतिसाद पाहून म.गांधी आनंदून गेले.
विद्यार्थ्यांना सांगितले ब्रह्मचर्याचे महत्व
बापूजींच्या निवासाची सोय 'मनमाड कंपनी' (आताचा सिग्नल चौक) येथे करण्यात आली होती. त्यांनी दिवसभर मान्यवर नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यायामशाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी 'ब्रह्मचर्येचे' महत्व समजावून सांगितले. आपल्यातील शक्तीचा वापर देशविधायक कामांसाठी करावा, असा मंत्रही त्यांनी दिला. रात्री साडेदहाला पंजाब एक्सप्रेसने त्यांनी नाशिककडे प्रयाण केले.
पालिकेच्या स्मरणिकेत स्मृतींचा जागर
चाळीसगाव नगरपरिषदेने २०१९ मध्ये शताब्दी वर्षात पदार्पण केले. १९७१ मध्ये याच पालिकेच्या सुवर्ण महोत्सनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘स्मरणिकेत’ म.गांधीजींच्या चाळीसगाव भेटीच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. तत्कालिन नगराध्यक्ष कै. अनिलदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कै. वि.वि.भागवत व कै.र. भा. कासार यांनी स्मरणिकेचे संपादन केले होते. १ मे १९७१ रोजी मान्यवरांच्या उपस्थित स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे.