धरणगावचे ग्रामदैवत पुरातन बालाजी मंदिराचा जिर्णोध्दार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 03:06 PM2019-04-11T15:06:09+5:302019-04-11T15:07:00+5:30
१३ रोजी कामाचे भूमीपूजन
धरणगाव-- ग्रामदेवता असलेल्या येथील २२५ वर्षापूर्वीच्या श्री बालाजी मंदिराचा जिर्णोध्दार भूमीपूजन सोहळा १३ रोजी परिसरातील संतश्रीच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डी.आर.पाटील व पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत दिली.
१३ रोजी भूमीपूजन दू. ४.३० वा.श्री क्षेत्र सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प.पू.प्रसाद महाराज यांच्या हस्ते व श्री नारायण भक्तीपंथचे मुख्य प्रवर्तक प.पू.लोकेशनंदजी महाराज, रामेश्वर संस्थानचे महंत नारायण स्वामी व वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमूख महामंडलेश्वर हभप भगवान महाराज या विभूतींच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न होत मंदिराची मालकी व पुजेचा अधिकार वारसाहक्का प्रमाणे पुराणिक बंधूंचा अबाधित ठेऊन श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळ समाजाच्या सहकार्याने जिर्णोध्दार करणार आहे. आगामी २ वर्षात जिर्णोध्दाराचे काम पुर्ण करण्याचा मानस आहे. मंदिराचा आराखडा धुळे येथील आर्किटेक्ट रवि बेलपाठक हे विनामूल्य तयार करत आहे.
येथील श्री व्यकटेश नागरी पतपेढीच्या सभागृहात झालेल्या पत्रपरिषदेस उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी, अशोक येवले व मंदिराचे विश्वस्त पुराणीक कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी सांगितले की, बालाजी मंदिराला ड वर्गाचे पर्यटन स्थळ म्हणून मंजूरी मिळाली असून सभामंडप व इतर कामांसाठी २ कोटी ९१ लक्ष निधी मंजूर केला आहे. मंदीर बांधकाम लोकवर्गणीतून केले जाणार आहे. याबाबत पुराणिक कुटूंबियांशी असलेला वाद संपुष्टात आला असून बालाजी व्यवस्थापक मंडळ व पुराणिक कुटुंबियामध्ये सामजस्य करार झाला असल्याने मंदिर बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंदीराच्या बांधकामासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मंडळाने केले आहे.