कांग नदी काठावरील पुरातन महादेव मंदिर : जामनेरला भाविकांचे श्रद्धास्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 04:16 PM2018-08-26T16:16:54+5:302018-08-26T16:17:33+5:30
आजही उसळणार गर्दी
जामनेर, जि.जळगाव : जामनेर शहरातून वाहणाऱ्या कांग नदीच्या काठावर वसलेले पुरातन महादेव मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. श्रावणात दररोज येथे दर्शनासाठी भाविक येतात. सोमवारी सकाळपासून अभिषेक व पूजेसाठी महिलांची वर्दळ दिसून येते.
पुरा भागातील हे महादेवाचे येथील पहिलेच मंदिर असावे, असे सांगितले जाते. मंदिराला लागूनच असलेली पायºयांची विहीर याची साक्ष देते. सध्या ही विहीर बंद असली तरी त्यात भरपूर पाणी आहे.
मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर श्रावणात भक्तांकडून दररोज दूध व जलाचा अभिषेक केला जातो. या मंदिरातच राम, लक्ष्मण व सीतेची, हनुमानाची व विठ्ठलाची मूर्ती आहे.
मंदिरासमोर पुरातन मूर्ती पडलेल्या असून त्याबाबतची माहिती मिळू शकली नाही. मुरलीधर बैरागी हे पूर्वी पुजारी होते. आता त्यांचे चिरंजीव दुर्गादास बैरागी मंदिराची देखभाल करतात. मंदिर परिसरातील मोकळ्या जागेवर पत्र्याचे शेड टाकण्यात आल्याने येथे नित्यनेमाने धार्मिक कार्यक्रम होतात.
सुमारे दिडशे वर्षापूर्वीच्या या मंदिराची उभारणी येथील रहिवासी हातवळणे यांनी केल्याचे सांगण्यात येते. मानमल राजमल ललवाणी यांनी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी आर्थिक सहकार्य केले. स्व.प्रेमराज मोयल, बद्रीलाल बुले, गिरीराज शर्मा, बाबूलाल सोनी, तुळशीराम पांडे यांनी त्यांना सहकार्य केले.
श्रावण महिन्यात येथे दररोज रात्री शिवपुराण कथेचे वाचन सुरू असून, भाविकांची मोठी गर्दी होते.