कजगावात प्राचीन कुवारी पंगत आजही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:20 AM2021-08-27T04:20:35+5:302021-08-27T04:20:35+5:30
कजगाव, ता. भडगाव : ग्रामीण भागात जुन्या रूढी परंपरा कटाक्षाने पाळल्या जातात. अशीच एक जुनी परंपरा कजगावकर ग्रामस्थ अडीचशे ...
कजगाव, ता. भडगाव : ग्रामीण भागात जुन्या रूढी परंपरा कटाक्षाने पाळल्या जातात. अशीच एक जुनी परंपरा कजगावकर ग्रामस्थ अडीचशे वर्षांपासून मोठ्या श्रद्धेने पाळत आहेत. येथे अंदाजे अडीचशे वर्षांपूर्वी भाईकनशा फकीर बाबाने घालून दिलेली कुवारी पंगतीची प्रथा कजगावकर आजही मोठ्या श्रद्धेने चालवत आहेत. श्रावण महिन्यात गुरुवारी पंगतीचे आयोजन करण्यात येते. याप्रमाणे दि. २६ रोजी पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला.
भाईकनशा फकीरबाबांच्या समाधिस्थळी (दर्गा) सर्व ग्रामस्थ जमल्यानंतर याठिकाणी दर्ग्यावर चादर चढवून व फूल अर्पण केल्यानंतर मौलाना रियाज यांनी मंत्र पठण करून विधी पार पाडले. नंतर बाबांच्या वास्तव्यस्थळी पूजन करून अकरा मुलांना विधिवत गोड भाताची पंगत दिल्यानंतर शेकडो कुवारी मुलांची गोड भाताची पंगत पार पडली.
फार जुन्या काळातील म्हणजेच साधारण अंदाजे अडीचशे वर्षांपूर्वी येथील गढीमध्ये बुरुज बनवून एक फकीरबाबा आपल्या रखवालदारासह राहू लागला होता. दरम्यान, परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण गावकरी भाईकनशा फकीरबाबांच्या बुरुजाजवळ जमले. बाबाच्या हातात जपमाळ होती. जप करणे सुरू होते. काही क्षणात बाबाची दृष्टी गावकऱ्यांवर पडली. साऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीसंदर्भात व्यथा मांडली. बाबांनी गावकऱ्यांना विचारले, मी जे सांगेल ते तुम्ही ऐकाल का? साऱ्या गावकऱ्यांनी होकार दिला. यानंतर येणाऱ्या भीषण परिस्थितीसंदर्भात तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गुरढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न अन्नधान्य या साऱ्या व्यथा बाबांजवळ मांडल्या.
बाबांनी आपला जप थांबविला आणि संपूर्ण गावातून यथाशक्ती वर्गणी रोख स्वरूपात किंवा अन्नधान्य स्वरूपात गोळा करा आणि संपूर्ण गावात बालकांना गोड भाताची पंगत द्या, असे म्हणत पुन्हा ध्यानस्त होत जप सुरू केला.
बाबांच्या आदेशानुसार गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली आणि श्रावण महिना सुरू असल्याने गुरुवारी कुवारी पंगतीचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावातील कुवारी बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला. कुवारी पंगतीचा कार्यक्रम संपला नि काही वेळातच मेघराजा जोरदार बरसला. संपूर्ण गावात आनंद उत्सव साजरा झाला. दुष्काळी परिस्थिती बदलली. सर्वत्र शिवार फुलले नि सारे गावकरी बाबांच्या बुरुजाजवळ जमले. सारेच बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हापासून गावकऱ्यांनी कुवारी पंगतीची प्रथा कायम सुरू ठेवली आहे. दमदार पाऊस झाला तरी किंवा पावसाने दडी मारली तरी कुवारी पंगतीचे आयोजन दरवर्षी केले जाते. संपूर्ण गावकरी यात सहभागी होऊन हा एक उसत्व साजरा करतात. यात सर्वधर्माचे सदस्य सहभागी होतात.
तब्बल अडीचशे वर्षांपासून ही परंपरा गावकरी मोठ्या श्रद्धेने चालवत आहेत. आज श्रावण महिन्याचा गुरुवार असल्याने आज कुवारी पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उद्योजक दिनेश पाटील, स्वप्निल पाटील, दादाभाऊ पाटील, सुनील पवार, नीलेश पाटील, योगेश पाटील, अरुण पाटील, राजेंद्र पाटील, रवि पाटील, कोमल पाटील, भय्या महाजन, मनोज सोनार, जयपाल पाटील, अतुल पाटील, सचिन पाटील, हरीश पाटील, योगेश पाटील, भय्या पाटील, मुन्ना पाटील, पृथ्वीराज पाटील, भूषण पाटील, सुनील पाटील, विनोद पाटील, प्रवीण पाटील, नारायण पाटील, समाधान पाटील, स्वप्निल पाटील, रफिक तांबोळी, फत्तेसिंग पाटील, एकनाथ पाटील, संदीप पाटील, सोनू पवार, सादिक खाटीक सह असंख्य ग्रामस्थांनी मेहनत घेतली आणि बाबांनी जिवंत समाधी घेतली. ज्या बाबांनी कजगावात कुवारी पंगतीची प्रथा घालून दिली, त्या बाबांनी आपल्या वृद्धापकाळात त्या काळी तितुर नदीच्या काठी घनदाट अरण्यात जिवंत समाधी घेतली. ते समाधिस्थळ आज हिंदू-मुस्लिमांचे देवस्थान बनले आहे. दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बाबांच्या नावाचा उरूस भरविण्यात येतो. कुस्त्याची दंगल, तमाशा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. उरूसच्या दिवशी समाधिस्थळाचे हिंदू-मुस्लीम दर्शन घेतात.
260821\26jal_2_26082021_12.jpg
कुवारी पंगतीत गोड भाताचा आस्वाद घेताना लहान बालकगोड भात बनविण्यात व्यस्त आचारी व युवक