“ताई, तू लढत राहा, आम्ही सोबत आहोत”; दिव्यांग ‘बहिणी’ने ओवाळले, देवेंद्र फडणवीस गहिवरले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:20 AM2023-06-28T10:20:31+5:302023-06-28T10:21:04+5:30
Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाला भेट दिली. या वेळी लक्ष्मी शिंदे हिने पायाने फडणवीस यांचे औक्षण केले.
Devendra Fadnavis News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजळगाव दौऱ्यावर होते. “शासन आपल्या दारी' कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाला भेट दिली. या वेळी लक्ष्मी शिंदे हिने पायाने फडणवीस यांचे औक्षण केले. यानंतर देवेंद्र फडणवीसांचे डोळे पाणावले.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून माहिती दिली. आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळले. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेने अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा. हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारते. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्याने टिळा लावणाऱ्या, त्याचे पायाने आरतीचे तबक ओवाळणाचा, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहयावर हास्य फुललेले होते. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की, तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे. ते पाहून मी इतकंच म्हणालो, ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले. अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री फडणवीसांचा खडसेंवर हल्लाबोल
जमिनीत तोंड काळे केले नसते तर आज त्यांच्यावर आम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती. त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे, ते सांगतात तसेच ते करतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे पर टीका केली. मोदींमुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. ते पंतप्रधान राहिले तर, अनेक घोटाळे बाहेर येतील, हे लक्षात आल्यामुळे विरोधक सर्व एकत्र आले आहेत, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.
आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं… pic.twitter.com/WF1X3ab7wA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 27, 2023