आणि...वाहनांचा कर्णकर्कश आवाजऐवजी येत होता पक्ष्यांचा किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 05:12 PM2019-09-18T17:12:08+5:302019-09-18T17:15:25+5:30
विना वाहन दिवस साजरा : एसएसबीटी महाविद्यालयातील उपक्रम
जळगाव- महाविद्यालयाच्या आवारात दररोज येणारा वाहनांचा कर्णकर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. शांत, रम्य वातावरणात सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवारता आला नाही. निमित्त होते ते, एसएसबीटी महाविद्यालयात महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विना वाहन दिवसाचे.
बांभोरी परिसरातील एसएसबीटी महाविद्यालयात दररोज सुमारे ५०० च्यावर वाहने ये-जा करित असतात व उभया असतात. मात्र, महाविद्यालयातील नेचर फ्रेंड क्लबच्या माध्यमातून मंगळवारी विना वाहन दिवस साजरा करण्यात आला. सोबतच दर महिन्याला एक दिवस विना वाहन दिवस पाळण्यात येईल, असा संकल्प यावेळी करण्यात आला. क्लबच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात कार आणि दुचाकी वाहन धारकांना ‘नो व्हेईकल डे’ विषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जनजागृती मोहिमेला वाहनधारकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला.
१७३ वाहने महाविद्यालयात आली...!
काही प्रमाणात का होईना..पण प्रदुषणाचे प्रमाण कमी होईल, सोबतच महामार्गावर होणारी ट्रॅफिक सुध्दा कमी होईल. हा उद्देश समोर ठेवून नेचर क्लबच्या माध्यमातून मंगळवारी विना वाहन दिवस साजरा करण्यात आला. सोमवारी महाविद्यालयात ४७९ वाहने उभी होती. मंगळवारी मात्र, तब्बल ६६ टक्के महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभियानात सहभागी होऊन खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनांचा वापर करून महाविद्यालय गाठले. त्यामुळे फक्त १७३ जण वाहनांनी महाविद्यालयात आले होते़ तर ३०६ जणांनी सार्वजनिक वाहनांचा वापर केला.
परिसर शांत व रम्य..!
महाविद्यालयाच्या नेचर क्लबच्या माध्यमातून राबविलेले विना वाहन दिवसामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यास हातभार लावून पर्यावरण संवर्धन होण्यास मदत झाली. महाविद्यालय परिसरात वाहनांची संख्या असल्यामुळे परिसर शांत, रम्य, प्रसन्न आणि हिरवाईने नटलेला वाटत होता. त्यामुळे वाहनांच्या आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता़ या प्रकराचा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयात राबविण्यात यावा, असे आवाहनही केले आहे़ दरम्यान, या मोहिमेत पहिल्याच टप्प्यात ६६ टक्के वाहनधारक सहभागी झालेत म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य प्रा.डॉ. एस. पी. शेखावत, नेचर क्लबचे कॉर्डिनेटर प्रा.डॉ. एम. हुसेन, प्रा. गौरव खोडपे यांनी समाधान व्यक्त केले. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विराज भामरे, कल्पेश पाटील, अनुप पाटील, पराग सुतारे, संकेत सोनवणे, शुभम शुक्ला, तुषार पाटील, मनीष महाजन, विपुल बिºहाडे व नेचर क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.