अंगणवाडी बालकांना अपघात विमा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 10:42 PM2019-12-18T22:42:39+5:302019-12-18T22:43:58+5:30
अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रमोद पाटील
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे एका तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीत शिकणाऱ्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बालकांना अपघात विमा योजनेबाबत कुठलीच सुविधा मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दि.१२ रोजी एका चारचाकी वाहनाने कासोद्यातील साईबाबा मंदिराजवळ एका तीन वर्षे वयाच्या अंगणवाडीत शिकणाºया गरीब आदिवासी मुलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. पण तिच्या दुर्दैवाने अंणवाडीत शिकत असणाºया कोणत्याही विद्यार्थ्यांना अपघात विम्याचा लाभ मिळत नसल्याची माहिती या घटनेनंतर मिळाल्याने ह्या अंगणवाडी विद्यार्थ्यांना पण अपघात विमा मिळाला पाहिजे, ही मागणी पालक वर्गातून पुढे आली आहे. यानंतर वरखेडी, ता.पाचोरा येथे १८ रोजी अंगणवाडीतील आणखी एका बालिकेचा अपघातात मृत्यू झाला.
पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया सर्व विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अशी काही दुर्घटना घडल्यास पीडित कुटुंंबाला त्वरित आधार दिला जातो. परंतु अंगणवाडीत शिकणारे विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहेत.
जळगाव जिल्ह्यातील ३६४० अंगणवाडीतून २ लाख ५० हजार विद्यार्थी सहा महिने ते ५ वर्षे वयोगटातून शिक्षण घेत आहेत, तर राज्यात १ लाख ९ हजार अंगणवाडीत शिक्षण घेणºया कोट्यवधी बालकांना कुठलीही अपघात विमा लागू करण्यात आलेली नसल्याने पालकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सध्या प्रत्येक पालकाला एक किंवा दोनच अपत्य असतात. यापैकी एकावर जरी अपघातात आघात आला तर कुटुंब सैरभैर होते. हा आघात पचवणे जिकिरीचे होते. त्यातच मोलमजुरी करणाºया गरीब कुटुंबात अशी घटना घडली तर पूर्ण कुटुंबच उघड्यावर येते. अशा कुटुंबांना तत्काळ मदतीचा हात शासनाकडून पुढे आला पाहिजे, पण दुर्दैवाने या प्रश्नी आजपर्यंत उदासीनता दिसते आहे.
अंगणवाडी बालकांना कुठल्याही अपघात विमा योजनेचे संरक्षण नाही. त्यामुळे कासोद्यातील अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेला कुठलाही लाभ देता येत नाही.
-शीतल पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी, पं.स., एरंडोल
हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण मिळवून देणेसाठी या अधिवेशनातच याप्रश्नी लक्ष वेधले जाईल.
-आ.चिमणराव पाटील, एरंडोल
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपघात विमा मिळतो. तसा अंगणवाडीतील बालकांनादेखील असेच संरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करणार आहे.
-उज्वला पाटील, अध्यक्षा, जि.प., जळगाव
गेली आठ वर्षे मी जिल्हा परिषदेत काम करीत आहे. पण आजतागायत अंगणवाडीतील एकाही बालकाला अपघात विम्याचा लाभ मिळाला किंवा तशी घटना घडली, अशी माहिती नाही.
-रफिक तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., जळगाव