जलवाहिनीच्या कामाबाबत दोन्ही गटाच्या नगरसेवकांकडून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:06 PM2020-07-03T22:06:34+5:302020-07-03T22:06:40+5:30
चाळीसगाव पालिका सभा : ६० विषयांना मंजुरी, रस्त्यांचा प्रश्नही गाजला
चाळीसगाव : चार महिन्यांनंतर पालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर वादळी चर्चा झाली. एकूण ६० विषय मंजूर करण्यात आले. शहरात सुधारित पाणीपुरवठा योजनेतर्गत जलावाहिनीचे काम सुरू आहे. याकामाबाबत सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्यांनीदेखील संताप व्यक्त केला. कामाला मुदतवाढ देण्यालाही तीव्र विरोध दर्शवला. शहरातील रस्त्यांबाबत सदस्य आक्रमक झाले होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सकाळी साडेअकरा वाजता सर्वसाधारण सभेला नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. यावेळी उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, गटनेते संजय रतनसिंग पाटील, शविआचे उपगटनेते सुरेश स्वार, प्रभारी मुख्याधिकारी विजय मुंडे व सदस्य उपस्थित होते. सभा साडेतीन तास चालली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जलवाहिनीच्या कामासाठी १५ महिन्याची मुदत मागण्यात आली होती. परंतु याला सदस्यांनी तीव्र विरोध केला. जलवाहिनाच्या कामामुळे शहरात नागरिकांना चालणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी जोरकस मागणी सदस्यांनी केली.
सभा का घेतली?
सभेची सुरुवात होताच सत्ताधारी गटाचे नगरसेवक चंद्रकांत तायडे यांनी शहरात कारोनाची संख्या वाढत असतांना सभा घेणे गरजेचे होते काय? असा प्रश्न उपस्थित केला. शहरातील दोन नगरसेवकांच्या प्रभागातच कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. अशा स्थितीत सदस्यांना कोरोनाची लागण झाली तर आमच्या परिवाराची जबाबदारी तुम्ही घेणार काय? जिल्हाधिकाऱ्यांनीच परवानगी नाकारली असताना सभा का घेतली ? असेही प्रश्न तायडे यांनी विचारले. शहरात रस्ते, गटारींच्या समस्या आहेत. नागरिक त्रस्त झाले आहे. अशा स्थितीत सभा घेणे गरजेचे होते काय ? असा सवाल शविआचे उपगटनेते सुरेश स्वार यांनी उपस्थित केला.
यावर प्रभारी मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी आगामी काळात शहरवासीयांच्या समस्या वाढू नये. यासाठी ही सभा बोलावण्यात आली असल्याचे सांगितले. शहरवासीयांच्या काळजीसाठी व समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी केले.
शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत
आनंद खरात यांनी शहरवासीयांची अस्मिता असलेल्या शिवस्मारकाचे काम कधी पूर्ण होईल? असा प्रश्न विचारुन हा मुद्दा चर्चेत आणला.
टाळेबंदीमुळे काम रखडल्याची माहिती अभियंता विजय पाटील यांनी दिली.
आनंदा कोळी, दीपक पाटील, सविता राजपूत, संगीता गवळी, शेखर देशमुख, रामचंद्र जाधव, सूर्यकांत ठाकुर तसेच गटनेते संजय पाटील, घृष्णेश्वर पाटील, वत्सलाबाई महाले यांनाही विविध प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला. एका वर्षापासून पालिकेत मुख्याधिकारी नाही. चार वर्षांपासून शहरात काहीही कामे झाले नाहीत, अशी काय समस्या आहे की चाळीसगाव नगरपालिकेला मुख्याधिकारी मिळत नाही, असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला.