पुतळा विटंबनेनंतर समतानगरात संताप! एक जण ताब्यात : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणारा मोर्चा माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 02:30 PM2023-06-24T14:30:15+5:302023-06-24T14:30:33+5:30
१९८२ मध्ये स्थापन केलेल्या या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सहा वाजता उजेडात आला. त्यानंतर या भागातील शेकडो समाजबांधव एकवटले.
जळगाव : येथील समतानगरात असलेल्या राष्ट्रमहापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उजेडात आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले आणि एक जण ताब्यात घेतल्याची माहिती देत कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याने मोर्चेकरी माघारी परतले.
१९८२ मध्ये स्थापन केलेल्या या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सहा वाजता उजेडात आला. त्यानंतर या भागातील शेकडो समाजबांधव एकवटले. ही घटना कळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवाय.एस.पी.संदीप गावीत, रामानंद पोलीस स्टेशनच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी धडकला. पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. मात्र जमावाने आरोपीला अटक करुन त्याच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यासाठी आग्रह धरला. त्यासाठी जमाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्यादिशेने निघाला. काव्यरत्नावली चौकात हा मोर्चा आल्यावर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार मोर्चेकऱ्यांना सामोरे गेले.
कठोर कारवाई आश्वासन
एम.रामकुमार यांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती यावेळी मार्चेकऱ्यांना दिली. याप्रकरणी चौकशी सुरु असून संशयित आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे. त्याच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करु, असे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चेकरी माघारी परतले.
पुतळ्याचे शुद्धीकरण
आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच राष्ट्रपुरुषांचे पूजन करुन त्यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर रिपाइंचे महानगराध्यक्ष अनील अडकमोल, सचीन अडकमोल, प्रताप बनसोडे, दिलीप सपकाळे, मुकूंद सपकाळे, सोनू आढाळे, किशोर जाधव, अजय अडकमोल, शारदा अडकमोल, उज्ज्वला अडकमोल, अनील लोंढे, गौतम सरदार, दादाराव अडकमोल, किरण अडकमोल, विक्की नन्नवरे, सागर सपकाळे, कामिनी अडकमोल, मनीषा सपकाळे, मनीषा बाविस्कर, अलका ढिवरे, शोभा साळवे, हिराबाई नन्नवरे, लता आढाळे आदींनी पुतळ्याचे शुद्धीकरण केले आणि पूजाविधी करुन पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
दरम्यान, रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे कसून चौकशी सुरु आहे. स्वत: पोलीस अधीक्षकांनी या आरोपीकडे चौकशी केली. या प्रकरणात अन्य कुणाचा सहभाग आहे किंवा नाही, याचाही तपास सुरु आहे.