दवाखान्यात जाणाऱ्या कुटुंबियावर साइड न दिल्याच्या रागातून हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:19 AM2021-03-01T04:19:07+5:302021-03-01T04:19:07+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश प्रतापराव साळुंखे यांना कमरेचा त्रास असल्याने नाशिक येथे शस्त्रक्रियेची १ मार्चची तारीख मिळाली आहे. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश प्रतापराव साळुंखे यांना कमरेचा त्रास असल्याने नाशिक येथे शस्त्रक्रियेची १ मार्चची तारीख मिळाली आहे. त्यासाठी मुलगा योगेश सुरेश साळुंखे, त्याचे काका अरुण साळुंखे, आई लताबाई, काकू ऊर्मिला साळुंखे, वैशाली साळुंखे असे शनिवारी कारने (क्र.एम.एच १९ एच.के ३३९५) नाशिकला जाण्यासाठी दुपारी निघाले. दुपारी १.४० वाजेच्या सुमारास मोहाडी रस्त्याजवळ आल्यावर मागून दुचाकीवर दोन जण आले आणि कारसमोर आडवे झाले. कार चालक अरुण साळुंखे यांना इच्छादेवी चौकापासून आम्हाला साइड का दिली नाही, म्हणून जाब विचारून शिवीगाळ केली.
समजाविण्याचा प्रयत्न केला अन् हल्ला
कारमधील सर्वांनी दुचाकीस्वारांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता एकाने सुरेश साळुंखे आणि अरुण साळुंखे या दोन्ही भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच लताबाई यांच्या हाताच्या बोटास दुखापत केली. हेमंत चौधरी याने दगडांचा मारा सुरू केला, त्यात सुरेश साळुंखे यांच्या डोक्याला दगड लागून प्रचंड रक्तस्राव झाला. यावेळी दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, नितीन पाटील, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, किशोर बडगुजर यांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत जखमी रुग्णालयात गेले होते, तर हेमंत व जगदीश या दोघांना घरातून ताब्यात घेतले. सायंकाळी योगेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तपास अल्ताफ पठाण करीत आहेत.