ग्रामपंचायतींमधील गैरव्यवहारांच्या रखडलेल्या वसुलीवर पदाधिकाऱ्यांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:26 AM2020-12-05T04:26:30+5:302020-12-05T04:26:30+5:30
जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी जि.प.च्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर ...
जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी जि.प.च्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष लालचंद पाटील व सीईओ डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते. तसेच सदस्यांमध्ये मधुकर काटे, नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, कैलास सरोदे, प्रताप पाटील, रविंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीलाच नानाभाऊ महाजन यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून झालेल्या गैरव्यहाराची वसुली ग्रामपंचायत विभागाकडून संथ गतीने सुरू आहे. या गैरव्यहाराबाबत करण्यात आलेल्या ऑडीटमध्ये ७०० ग्रामपंचायतीत विविध योजनांमध्ये भष्ट्राचार झाल्याचे समोर आले आहे. तसेच ही वसुली करण्याबाबत तात्काळ आदेश असतांनाही ग्रामपंचायत विभागाकडून वसुलीबाबत कुठलीही कारवाई होत नाही. सरपंच व ग्रामसेवकांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप या सदस्यांनी केला. या प्रकरणी सीईओंनी लक्ष देऊन वसुली वाढवा, अन्यथा कर्मचाऱ्यांच्या पगारातुन वसुली करा, अशी मागणींही सदस्यांनी केली.
कोविडच्या निधीवरून गदारोळ
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेला चार महिन्यांपूर्वी कोविड संदर्भात दोन कोटींचा मदत निधी दिला होता. हा निधी खर्च झाल्यानंतर आणखी तीन कोटींची निधी देणार होते. मात्र, जि. प. प्रशासनाने फक्त १ कोटींचा निधी खर्च केल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी जिपच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करून संताप व्यक्त केला.