बंड अखेर शमले : जळगावातील भाजपचे खासदार ए.टी. पाटील म्हणतात, पक्ष निर्णय मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:42 PM2019-04-05T12:42:59+5:302019-04-05T12:43:30+5:30
शिरीष चौधरींचा ‘पाठींबा’
जळगाव : तिकीट नाकारल्याने बंडाचा झेंडा हाती घेतलेले ए.टी. पाटील व दोघांच्या भांडणात उमेदवारी मला द्या नाहीतर अपक्ष उमेदवारी दाखल करतो असा इशारा देणाऱ्या आमदार शिरीष चौधरी यांचे बंड भाजपाने उमेदवारी बदलताच शमले. उमेदवारी नाकारली तरी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे खासदार ए.टी. पाटील ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले.
खासदार ए.टी. पाटील यांनी गेल्या महिन्यात २७ रोजी उमेदवारी नाकारली गेल्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता.
यावेळी त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर षडयंत्राचा आरोप करून उमेदवारी न मिळाल्यास बंडाचा इशारा दिला होता.
तसेच मला उमेदवारी देत नसाल तर वाघ कुटुंबात कुणाला नको, आमदार उन्मेश पाटील चालतील असेही म्हटले होते. त्यानुसार पक्षाने निर्णय घेतल्याने ए.टी. पाटील यांचे बंड शमले.
ए.टी. पाटील म्हणाले... उमेदवारी मिळेल याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षा होती.
उमेदवारीसाठी प्रयत्नही केले. दहा वर्षे पक्षाने संधी दिली,मोठे केले. पक्षाने घेतलेला निर्णय आपणास मान्य आहे.
आता माझा पाठींबा
उमेदवारीबाबत पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपण उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मतदार संघात विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे दोघा नेत्यांनी आपणास आश्वासन दिल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे भाजपा उमेदवारास आपला पाठींबा असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बंड शमले
दोघांनी दिलेल्या प्रतिक्रीयांवरून त्यांचे बंड शमल्याचेच लक्षात येत आहे. मात्र भविष्यातील भूमिकेबद्दल खासदार ए.टी. पाटील यांनी बोलणे टाळले.