संतप्त नागरिकांनी आमदारांसह नगरसेवकांना रस्त्यावरील खड्डयांमधून चालविले पायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:04 PM2020-01-29T12:04:19+5:302020-01-29T12:04:58+5:30

काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकी रस्ता डांबरीकरणासाठी नागरिक रस्त्यावर

Angry citizens drove the city councilors along with the MLAs through the pits of the road | संतप्त नागरिकांनी आमदारांसह नगरसेवकांना रस्त्यावरील खड्डयांमधून चालविले पायी

संतप्त नागरिकांनी आमदारांसह नगरसेवकांना रस्त्यावरील खड्डयांमधून चालविले पायी

Next

जळगाव : अनेक महिन्यांपासून खड्डयांचा त्रास सहन करत असलेल्या जळगावकरांचा सहनशिलतेचा बांध अखेर मंगळवारी सकाळी फुटला. काव्यत्नावली चौक ते रामानंदनगर पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी स्थानिक रहिवाश्यांनी रास्तारोको आंदोलन करून आमदार व नगरसेवकांना खड्यांमधून पायी चालण्यास भाग पाडून धारेवरही धरले. आठ दिवसात रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर प्रत्येक जळगावकर रस्त्यावर उतरेल असा निर्वाणीचा इशाराच नागरिकांनी दिला. आमदारांनाही काम जमत नसेल तर राजीनामा द्या, असे सुनावले.
गेल्या दीड वर्षांपासून शहरात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. मुख्य भागातील रस्ते असो वा उपनगरातील रस्ते सर्व भागात सारखीच परिस्थिती आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी अमृतच्या मक्तेदारावर खापर फोडून या प्रश्नातून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र, वर्षभरापासून खड्डे, धुळ यामुळे जळगावकर अक्षरश: त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्त्यांवर अपघाताच्या दररोज लहानमोठ्या घटना घडत आहेत. मंगळवारी काव्यरत्नावली चौक, रामानंद नगर, गिरणा टाकी परिसरातील नागरिकांनी सकाळी १० वाजेच्या सुमारास रास्तारोको आंदोलन सुरु केले. तसेच जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार नाही. तोवर धरणे आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा नागरिकांनी दिला.
आठ दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा
जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याबाबत नागरिक ठाम होते. त्यानंतर आमदार भोळे यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर सर्वच पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घ्या अशी विनंती नागरिकांना केली. तसेच आठ दिवसांच्या आत रस्त्याची दुरुस्ती करू असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी अखेर आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, भारती सोनवणे यांची सोमवारीच महापौरपदी निवड झाली़ त्यांना दुसºयाच दिवशी आंदोलनाने नागरिकांनी सलामी दिली़
आंदोलनाला राजकीय किनार ?
या आंदोलनात भाजपच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी देखील सहभाग घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महापौरपदाच्या स्पर्धेत उज्ज्वला बेंडाळे देखील आघाडीवर होत्या.
मात्र, महापौरपद भारती सोनवणे यांना दिले गेल्याने त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच महापौरपदाची निवड झाल्यानंतर दुसºयाच दिवशी आंदोलन व त्यात सत्ताधारी नगरसेविकांनी सहभाग घेतल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघड झाल्याचे बोलले जात आहे.
सत्ताधारी नगरसेविकाही आंदोलनात झाल्या सहभागी
मनपा निवडणुकीत वर्षभरात शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची भाषा करणाºया सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्यास पूर्णपणे अपयश आले आहे. मंगळवारी रामानंद नगर भागातील नागरिकांनी सुरु केलेल्या आंदोलनात भाजपच्या स्थानिक नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे व गायत्री राणे या देखील सहभागी झाल्या. सत्ताधारी भाजपच्याच नगरसेविकांनाही जर आपल्या प्रभागातील रस्त्यांचा प्रश्नासाठी आंदोलनात सहभाग घेण्याची गरज पडत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना आपले हक्क रस्त्यावरच उतरू न मिळवावे लागतील असेच चित्र सध्या पहायला मिळत आहे. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा शहर अभियंता सुनील भोळे, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले.
अन् पदाधिकाºयांना खड्डयांमधून चालविले
आंदोलनकर्त्यांना समजावण्यासाठी आलेले आमदार सुरेश भोळे, कैलास सोनवणे, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे यांना नागरिकांनी रस्त्यांची स्थिती दाखविली. आपण नेहमी चारचाकी वाहनात फिरतात त्यामुळे खड्डयांची जाणीव तुम्हाला नाही. या खड्डयांची जाणीव व्हावी म्हणून नागरिकांनी पदाधिकाºयांना चक्क खड्डे असलेल्या रस्त्यावरून पायी चालविले.
‘लोकमत’ ने मांडला होता प्रश्न
रस्त्यांच्या प्रश्नाबाबत ‘लोकमत’ ने १३ जानेवारीच्या अंकात ‘जळगाव झाले धुळगाव’ या मथळ्याखाली समस्या मांडली होती. धुळ व खड्डयांनी त्रस्त असलेल्या जळगावकरांचा संतापाचा बांध फुटेल याबाबत देखील प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक नितीन लढ्ढा व नितीन बरडे यांनी देखील नागरिक रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.
काम जमत नसेल तर राजीनामा द्या ; आमदारांना सुनावले खडेबोल
आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन नागरिकांना दिले. नागरिकांना आता समजावून काहीच उपयोग नसून, जर काम करता येत नसेल तर राजीनामा द्या असे खडेबोल नागरिकांनी आमदार भोळे यांना सुनावले. यावेळी भोळे काही वेळ स्तब्ध झाले होते.
जिल्हाधिकाºयांनाच रस्त्याची गरज, नागरिकांना रस्त्याची गरज नाही का ?
मनपाने काही दिवसांपुर्वी काव्यरत्नावली चौकापासून रस्त्याचा दुरुस्तीचे काम सुरु केले. मात्र, ते काम जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानापर्यंतच केले. त्यानंतर काम पुन्हा थांबविण्यात आले आहे. याबाबत देखील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारीच या रस्त्यावरून जात नसून सर्वसामान्य नागरिकही या रस्त्यावरुन ये-जा करत असतात. त्यामुळे जसा विचार जिल्हाधिकाºयांचा करतात तसाच विचार कर भरणाºया नागरिकांचाही करावा असा टोला नागरिकांनी मनपा अभियंत्यांना लगावला.
मक्तेदाराला का सोडतात, त्यांच्यावर कारवाई करा किंवा रस्ता दुुरुस्ती करा
संतप्त नागरिकांनी मनपा प्रशासनासह, पदाधिकारी व अमृत योजनेच्या मक्तेदाराबाबत देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी रस्ता खोदण्यात आला. मात्र, त्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती झालीच नाही.काव्यरत्नावली ते गिरणाटाकी पर्यंत खोदलेले रस्ते मक्तेदाराने गेल्या वर्षभरापासून व्यवस्थित बुजविलेले नाही. पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी मक्तेदारावर खापर फोडत असतील तर कारवाई करण्यास प्रशासन का धजावते हा प्रश्न देखील नागरिकांनी उपस्थित केला.कारवाई करता येत नसेल निदान रस्ते तरी दुरुस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली.

Web Title: Angry citizens drove the city councilors along with the MLAs through the pits of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव