२६ डिसेंबरला दिसणार ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:10 PM2019-11-20T22:10:33+5:302019-11-20T22:10:45+5:30
जळगाव : तब्बल एक दशकानंतर २६ डिसेंबरला कंकणाकृती सूर्यग्रहण अर्थात ‘रिंग आॅफ फायर’ दिसणार आहे़ निसर्ग व अंतराळाशी नाते ...
जळगाव : तब्बल एक दशकानंतर २६ डिसेंबरला कंकणाकृती सूर्यग्रहण अर्थात ‘रिंग आॅफ फायर’ दिसणार आहे़ निसर्ग व अंतराळाशी नाते जोडणारी ही दुर्मिळ संधी देशवासीयांसह जळगावकरांना सुध्दा अनुभवायला मिळणार आहे़ त्यानिमित्ताने शहरातील कुतूहल फाउंडेशनतर्फे सुरक्षित सूर्यग्रहण अभियान राबविण्यात येणार आहे़ सूर्यग्रहणाकडे अंधश्रध्दा म्हणून न बघात वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघावा, असेही आवाहन करण्यात आले आहे़
गुरूवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता सूर्यग्रहणाला सुरूवात होणार असून सकाळी ११ वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती मिळाली आहे़ संपूर्ण जगातून हे सूर्यग्रहण भारतात सर्वाधिक चांगले दिसणार आहे़ त्यामुळे जगभरातून अनेक खगोलप्रेमी मंडळी त्या दरम्यान भारतात येणार आहेत. दरम्यान, जळगावात ६८़२१ टक्के कंकणाकृती ग्रहण दिसेल़
पीपीटी शो, कार्यशाळेतून दिली जाणार माहिती
कंकणाकृती सूर्यग्रहण डिसेंबर महिन्यात दिसल्यानंतर तब्बल १४ ते १५ वर्षांनंतर पुन्हा बघायला मिळणार आहे़ हे दुर्मिळ सौंदर्य सुरक्षितपणे बघावे, यासाठी शहरातील कुतूहल फाउंडेशनच्यावतीने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांमध्ये सुरक्षित सूर्यग्रहण अभियानातंर्गत पीपीटी शो, व्याख्यान, कार्यशाळांद्वारे सूर्यग्रहण का? व कसे बघावे याबाबत मार्गदर्शन व जनजागृती केली जाणार आहे़ तर अनेक ठिकाणी फाउंडेशनच्यावतीने सामुहिक सूर्यग्रहण बघण्याचा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे़
नासा वापरत असलेल्या फिल्टरपासून बनविले गॉगल्स
सूर्यग्रहण हे सुरक्षितरित्या विद्यार्थ्यांसह मोठ्यांना सुध्दा बघता यावे, म्हणून कुतूहलतर्फे सूर्यग्रहण ‘टेलिस्कोप’द्वारे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ या टेलिस्कोपला फिल्टर लावण्यात येणार आहे़ ते फिल्टर अमेरिकेतील कंपनीचे असून अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ देखील आपल्या सर्व प्रकल्पांमध्ये या फिल्टरचा वापर करीत असते़ त्याच फिल्टरचा वापर करून सूर्यग्रहण पाहण्यासाठी गॉगल्स बनविण्यात आले असून कुतूहलतर्फे ते सुध्दा उपलब्ध असणार आहे़ अभियानात सहभागी होण्यासाठी कुतूहल फाउंडेशनची संपर्क साधण्याचे आवाहन महेश गोरडे यांनी केले आहे़