Lok Sabha Election 2019 : धुळ््यात अनिल गोटे यांची बंडखोरी कुणाला ‘मारक’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:04 PM2019-04-13T13:04:12+5:302019-04-13T13:05:16+5:30

बंडखोरीवर भाजपा पक्षश्रेष्ठींचे मौन

Anil Gote's rebellion in Dhule is 'Marak'? | Lok Sabha Election 2019 : धुळ््यात अनिल गोटे यांची बंडखोरी कुणाला ‘मारक’?

Lok Sabha Election 2019 : धुळ््यात अनिल गोटे यांची बंडखोरी कुणाला ‘मारक’?

Next

धुळे : धुळे शहर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी करत लोकसभा मतदारसंघात आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आधी भाजपा उमेदवाराला पराभूत करण्यासाठी उमेदवारी करीत असल्याची घोषणा देणाऱ्या आमदार अनिल गोटे यांनी नंतर मात्र आपली उमेदवारी जिंकण्यासाठी असल्याचे सांगत भाजपासह सर्वच पक्षाला आव्हान दिले. दुसरीकडे भाजपा पक्षश्रेष्ठींनी मात्र सुरुवातीपासूनच आमदार अनिल गोटे यांच्या बंडखोरीवर मौन बाळगत दुर्लक्ष केले. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तर गोटेंनी डिपॉझीट वाचवून दाखवावे, असे आव्हानच दिले आहे.
धुळे लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदार अनिल गोटे यांनी आपण निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला होता. तसेच धुळ्यात आयोजित सभेत व्यासपीठावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो प्रसिद्ध केले. तसेच ‘अण्णाला मत म्हणजे मोदी साहेबानांच मत’, असेसुद्धा लिहीले होते. अर्ज दाखल केल्यानंतर अनिल गोटे यांच्या उमेदवारी अर्ज माघारीसाठी भाजपा पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
भाजपा पक्षश्रेष्ठींचे मौन
धुळे महापालिका निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा देत स्थानिक भाजपा नेतेमंडळीविरुद्ध बंड पुकारले होते. त्यावेळी भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आमदार अनिल गोटे यांना मुंबईला बोलावून चर्चा करुन त्यांचा आमदारकीचा राजीनामा नामंजूर करीत असल्याचे जाहीर करुन मध्यस्थीचे प्रयत्न केले होते. आमदार अनिल गोटे यांच्याशी अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपा पक्षश्रेष्ठीने प्रयत्न केले होते. त्यामुळे यावेळीही तसे प्रयत्न होतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली. तसे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झाले नाही. गोटे यांच्या बंडखोरीवर कोणीच वक्तव्य केले नाही किंवा वक्तव्य करण्याचे टाळले. याउलट उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आयोजित भाजपच्या सभेत तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी डिपॉझीट वाचविण्याचेच आव्हान देऊन भाजप आता गोटेंशी जुळते घेण्यास तयार नसल्याचे संकेतच दिले होते.
अनिल गोटेसुद्धा ठाम
गोटे यांनीही सुरुवातीपासूनच अपक्ष उमेदवारी करण्याच्या निर्णयावर ठाम होते. तसेच त्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क व प्रचारही सुरु केला होता. त्यामुळे यावेळी गोटे हे माघारीच्या मुडमध्ये नव्हतेच, असे स्पष्ट होते. आता माघारीनंतर प्रत्यक्ष प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप नेते व आमदार गोटे यांच्यात आरोप - प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगणारच. परंतू आमदार गोेटेंची उमेदवारी या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस उमेदवारांपैकी कोणासाठी ‘मारक’ ठरणार, हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
काँग्रेस - राष्टÑवादीचेही मौन कायम
काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीनेही आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारीसंदर्भात कुठलेही वक्तव्य करण्याचे टाळले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर गोटे यांनी मुंबईत राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे धुळ्यातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पाठिंब्यासाठी गोटेंशी चर्चा करुन अर्ज माघारीसाठी प्रयत्न होतील, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ती सुद्धा फोल ठरली आहे.

Web Title: Anil Gote's rebellion in Dhule is 'Marak'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.