वडिलांकडून वारसाने मिळालेल्या व्यवसायात अनिल कांकरिया यांनी साधली प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:40 PM2018-12-15T12:40:31+5:302018-12-15T12:40:44+5:30
- सुशील देवकर राजस्थानातून जळगावात येऊन १९४४ मध्ये शहरातील रथ चौकात एका छोट्या किराणा दुकानापासून व्यवसायाची सुरूवात करणाऱ्या कांकरिया ...
- सुशील देवकर
राजस्थानातून जळगावात येऊन १९४४ मध्ये शहरातील रथ चौकात एका छोट्या किराणा दुकानापासून व्यवसायाची सुरूवात करणाऱ्या कांकरिया कुटुंबाने याच व्यवसायात प्रगतीचे शिखर गाठले आहे. वडिल झुंबरलाल कांकरिया यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाचा वारसा त्यांचे चिरंजीव अनिल कांकरिया यांनी आपल्या भावांच्या सोबतीने पुढे नेत या व्यवसायाचे ‘मॉडर्न रिटेल आऊटलेट चेन’मध्ये रूपांतर केले आहे.
कांकरिया कुटुंबिय १९४४ मध्ये राजस्थानहून जळगावात व्यवसायानिमित्त आले. त्यावेळी सर्व वस्तूंवर सरकारचे नियंत्रण होते. केवळ आठवडे बाजारातच सर्व प्रकारचे धान्य, किराणाची दुकाने भरायची. १९४५ पर्यंत तेल, मीठ, गूळ यासारख्या वस्तूंची दोनच दुकाने तर होलसेल किराणाची चार दुकाने होती. अशा परिस्थितीत झुंबरलाल कांकरिया यांनी व्यवसायाला सुरूवात केली. हळूहळू त्यात जम बसविला. १९६४ पासून किराणा मालाची घरपोच सेवा द्यायला सुरूवात केली.
व्यवसायात काहीतरी नवीन प्रयोग राबविण्याचे बाळकडू अनिल कांकरिया यांना मिळाले. त्यांनी या व्यवसायात नवीन उपक्रम राबविले.
सुरूवातीची खडतर वाटचाल
पहिले सुपरशॉप सुरू केले. त्यास सुरूवातीला ग्राहकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. मात्र त्यामुळे शहरात असलेले सर्व किराणा दुकानदार त्यांचे स्पर्धक बनले. नवजीवनमध्ये माल महाग मिळतो, असा अपप्रचार झाला. ग्राहकांचा प्रतिसाद कमी झाला. त्यांच्या साध्या किराणा दुकानाचा जेवढा खप होता, त्यापेक्षाही कमी खप झाला. दोन वर्ष ही परिस्थिती होती. मात्र मोठे बंधू कांतीलाल कांकारिया आणि लहान बंधू व व्यवसायाने सीए असलेले सुनील कांकरिया यांच्या मदतीने हा कठीण काळही पार केला. लोकांमध्ये ही संकल्पना रूजायला वेळ लागेल हे लक्षात घेऊन धीराने व्यवसाय केला. त्यामुळे यश मिळाले.
आज होतेय दरमहा ५कोटींची उलाढाल
२००७ पासून नवजीवन सुपर शॉपचे रिटेल चेनमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने विस्तार सुरू केला. आज जिल्ह्यात नवजीवनच्या २१ हजार चौरस फूट जागेत ७ शाखा आहेत. त्यापैकी ५ शाखा स्वमालकीच्या जागेत असून २ जागा लिजवर घेतलेल्या आहेत. त्यात १७५ कर्मचारी कामाला असून महिन्याला ९० हजार ग्राहक या सुपरशॉपला भेट देत असतात. तसेच महिन्याला सुमारे ५ कोटींची उलाढाल होते.
सुपरमार्केटचा खडतर प्रवास
अनिल कांकरिया यांनी किराणा व्यवसायातील भविष्यातील बदल ओळखून नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यांनी १३ आॅगस्ट १९९३ ला खान्देशातील पहिले सेल्फ सर्व्हीस स्टोअर म्हणजेच सुपरमार्केट सुरू केले. त्याबद्दल अनिल कांकरिया सांगतात ‘हे करणे तितके सोपे नव्हते. स्थानिक सहकारी बँकांनी त्यासाठी कर्ज देण्यास नकार दिला. त्यांना ‘मॉडर्न रिटेल’ची संकल्पनाच समजली नाही.
आम्ही देखील ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल का? याबाबत थोडे साशंक होतो. मात्र बँक आॅफ बडोदाच्या व्यवस्थापकांनी या संकल्पनेचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर विनातारण कर्जही मंजूर केले. त्यामुळे आपण योग्य दिशेनेच वाटचाल करीत असल्याची खात्री पटली.’
ज्यावेळी दुकानात वडिलांसोबत बसत होतो, तेव्हा वडिलांच्या वागण्या-बोलण्यावरून जे संस्कार झाले तोच मोठा वारसा मिळाला. तो वारसा पुढील पिढीलाही देण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही कौटुंबिक व्यवसाय असलेल्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायातच काम करून तसेच त्यात अधिक अभ्यास करून त्या व्यवसायास पुढे न्यावे.
-अनिल कांकरिया,
संचालक, नवजीवन सुपर शॉप.