मांगीतुंगी देवस्थानचे "आकाश" हरपले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 09:57 PM2018-05-26T21:57:05+5:302018-05-26T21:57:05+5:30
नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी देवस्थानच्या विकासासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या अनिलभाई श्रीचंदजी जैन (73) यांचे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निधन झाले.
पारोळा (जळगाव)- नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी देवस्थानच्या विकासासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या अनिलभाई श्रीचंदजी जैन (73) यांचे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निधन झाले. शनिवारी सकाळी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना ताताडीने धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. रविवारी सकाळी नऊ वाजता पारोळा येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.ते पारस, भरत आणि नीलेश यांचे वडील होत.
मांगीतुंगीसाठी आयुष्य अर्पण
अनिलभाईंनी 1970 च्या दशकापासून जैन भाविकांचे श्रद्धास्थान मांगीतुंगी येथे सेवेकरी म्हणून सक्रिय झाले. त्यानंतर या देवस्थानच्या विकासासाठी त्यांनी देशभर दौरे केले. सुमारे पंचवीस वर्ष त्यांनी मांगीतुंगी देवस्थानचे अध्यक्षपद सांभाळत विकास साधला. या देवस्थानाला नावारुपाला आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा ठरला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मांगीतुंगी देवस्थानातील सेवेकरींनी पारोळ्याकडे धाव घेतली. तर देशभरातील समाजबांधव आणि भाविक त्यांच्या परिवाराशी संपर्क साधून हळहळ व्यक्त करत होते.
मरणोत्तर नेत्रदान
अनिलभाईंच्या इच्छेनुसार शनिवारी सायंकाळी नेत्रदानाचे सोपस्कार पार पडले.