मोकाट श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी ‘पशू’ने घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:08+5:302020-12-23T04:13:08+5:30
जळगाव : शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव सुरू आहे. दरवर्षी पिसाळलेल्या श्वानांच्या चाव्यामुळे, अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी ...
जळगाव : शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव सुरू आहे. दरवर्षी पिसाळलेल्या श्वानांच्या चाव्यामुळे, अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात, असे होत असताना सुद्धा मनपा प्रशासनाकडून निर्बीजीकरणासाठी उपाययोजना केली जात नाही. अखेर मोकाट श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी ‘पशु अॅनिमल प्रोटेक्शन’ ही संस्था सरसावली आहे.
शहरातील अनेक भागांत अधूनमधून पिसाळलेल्या श्वानाकडून हल्ल्याचे प्रकार घडत असतात. आजवर त्यात कित्येक बालके व नागरिक जखमी झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे मनपाने बंद केले आहे. दुसरीकडे गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या श्वानांमुळे शहरवासीयांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. श्वानांचे प्रजनन कमी व्हावे, यासाठी आता शहरातील पशू अॅनिमल प्रोटेक्शन संस्थेच्या टीममध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन डॉक्टरसुद्धा आहेत. महाबळ, डीएसपी चौक, गुजराल पेट्रोलपंप परिसरातील सात ते आठ मोकाट श्वानांवर ही शस्त्रक्रिया आतापर्यंत करण्यात आली आहे.
संस्थेचे सदस्य करतात श्वानांचा सांभाळ
मोकाट श्वानांवर शस्त्रक्रिया झाल्यावर संस्थेतील एका सदस्याकडून त्यांचा सांभाळ केला जात असतो. पाच दिवस त्यांच्यावर उपचार केले जाते. प्रकृती ठणठणीत होताच, पुन्हा त्या श्वानांना जेथून आणले, त्या भागात सोडून दिले जाते. या मोहिमेसाठी पशू संस्थेच्या अध्यक्ष खुशबू श्रीश्रीमाळ, कोमल श्रीश्रीमाळ, भवानी अग्रवाल, अनुज अग्रवाल, हर्षल भाटिया, डॉ. जय राजपुत, अभिषेक जैन, तेजू आर्या, प्रिन्स महाजन, कल्याणी वाघ, दीपांशू दोषी, भूमिका मंत्री, गुंजन पाटील, हर्षल भाटिया आदी परिश्रम घेत आहेत.