पीडित कुटुंबाची अंनिस कार्यकर्त्यांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:38 AM2019-02-09T00:38:49+5:302019-02-09T00:46:23+5:30
चहार्डी येथील शिवाजीनगर प्लॉट भागातील रहिवासी मंगेश दगडू पाटील (वय १४) या विद्यार्थ्यांचे अपहरण करुन अनोळखी इसमाने त्याचा नरबळी दिल्याचा संशय असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे याची गांभीर्याने दखल घेवून पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन माहिती जाणून घेतली.
चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील शिवाजीनगर प्लॉट भागातील रहिवासी मंगेश दगडू पाटील (वय १४) या विद्यार्थ्यांचे अपहरण करुन अनोळखी इसमाने त्याचा नरबळी दिल्याचा संशय असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे याची गांभीर्याने दखल घेवून पदाधिकाºयांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन माहिती जाणून घेतली.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व सचिव विनायक सावळे यांच्या सूचनेनुसार प्रा.दिगंबर कट्यारे (कार्याध्यक्ष, जळगाव), डॉ. अय्युब पिंजारी, डॉ. नरेंद्र शिरसाठ, लोकेश लाटे (चोपडा) सचिन थिटे,( मुंबई ) रामवैभव शोभा रामचंद्र, (कोल्हापूर) यांनी मंगेशच्या चहार्डी येथील घरी जाऊन माहिती घेतली व त्याच्या आई आणि बहिणीला दिलासा दिला. नंतर या प्रकरणाचे तपासाधिकारी एपीआय मनोज पवार यांना निवेदन दिले व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध, उच्चाटन अध्यादेश अंतर्गत कलम (४) नुसार करणी, भानामती, जादूटोणा, भिती दाखवून अमानुष कृत्य करणे व नरबळी देणे या कायद्यानुसार तपासाबाबत पाठपुरावा करण्याविषयी पुस्तिका भेट देऊन चर्चा केली.
दरम्यान, पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन मंगेशची आई व मोठ्या बहिणीशी चर्चा करून तसेच घटनास्थळी गावठाण जवळ प्रत्यक्ष जावून अंनिस कार्यकर्त्यांनी माहिती जाणून घेतली.
डीएनए तपासणी
दरम्यान, तपासाधिकारी मनोज पवार यांनी माहिती देतांना सांगितले की, ५ फेब्रुवारी रोजी फक्त मंगेशचा उजव्या पायाचा तुकडा मिळाला असून तो देखील डीएनए तपासणीसाठी नाशिक येथे पाठविला आहे. तसेच पोलिसांनी तपासाकामी गावठाण, नदीनाले या भागात मंगेशचा उर्वरित मृतदेह शोधण्यासाठी तीन पथके नियुक्त केली आहेत. यात नरबळीसह इतर सर्व शक्यतांचा विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.