अंजली दमानिया न्यायालयापासून पळ का काढता? - एकनाथ खडसे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 09:43 PM2018-02-09T21:43:09+5:302018-02-09T22:09:00+5:30

आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे उपोषणास बसणार

Anjali Damaniya escape from the court? | अंजली दमानिया न्यायालयापासून पळ का काढता? - एकनाथ खडसे यांचा सवाल

अंजली दमानिया न्यायालयापासून पळ का काढता? - एकनाथ खडसे यांचा सवाल

Next
ठळक मुद्देराज्यभरात २७ ठिकाणी अबु्रनुकसानीचे दावेउपोषण करणार-खडसे

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि. ९ - अंजली दमानिया यांनी माझ्यावर केलेल्या बेछुट आरोपात काहीही तथ्य नसल्याचे समोर आले असून त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेला हा ‘उद्योग’ आहे. आरोपात तथ्य होते तर मग न्यायालयात हजर न राहता न्यायालयापासून पळ का काढतात, असा सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी जळगावात उपस्थित केला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बदनामी प्रकरणी रावेर न्यायालयाने गुरुवारी दमानिया यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. या संदर्भात शुक्रवारी एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रपरिषदेत खडसे यांनी दमानिया यांना हा सवाल केला.
अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या स्वीय सहायकाने लाच घेतली, कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम यांच्या पत्नीशी संभाषण, खडसे यांच्या जावयाने घेतलेले वाहन, पुण्यातील भोसरी येथील भूखंड प्रकरण असे वेगवेगळे आरोप केले होते. या संदर्भात बोलताना खडसे म्हणाले की, केवळ प्रसारमाध्यमाद्वारे प्रसिध्दी मिळविण्यासाठी कोणावरही खोटे आरोप करणे हा त्यांचा उद्योग आहे.
राज्यभरात २७ ठिकाणी अबु्रनुकसानीचे दावे-
खोटे आरोप केल्याने माझ्यासह पक्षाची बदनामी होत असल्याने राज्यभरात दमानिया यांच्या विरोधात २७ ठिकाणी अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले असून त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यात विविध संस्था, एजन्सींमार्फत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आढळून आले असल्याचा दावा खडसे यांनी या वेळी केला.
राज्यात ठिकठिकणी सुरू असलेल्या सुनावणीस अंजली दमानिया सातत्याने अनुपस्थित राहत आहे. त्यामुळेच न्यायालयाने पकड वॉरंट जारी केले असल्याचेही खडसे म्हणाले.
डॉक्टर मिळावेत यासाठी उपोषण करणार-खडसे
मुक्ताईनगर, भुसावळ, वरणगाव व बोदवड येथे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने ग्रामस्थांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या बाबत सातत्याने पाठपुरावा करुनही कार्यवाही होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला आहे.

Web Title: Anjali Damaniya escape from the court?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.