अंजलीने उभारला प्रस्थापितांविरोधात लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:48 AM2021-01-08T04:48:35+5:302021-01-08T04:48:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तृतीयपंथीय असलेल्या अंजली हिने भादली येथील वॉर्ड क्रमांक ४ मधून महिला राखीव या गटातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तृतीयपंथीय असलेल्या अंजली हिने भादली येथील वॉर्ड क्रमांक ४ मधून महिला राखीव या गटातून आपला अर्ज भरला होता. मात्र निवडणुक आयोगाच्या परिपत्रकानुसार तृतीयपंथीयाला राखीव गटातून निवडणूक लढता येत नाही, असे कारण पुढे करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज नाकारला. मात्र आता न्यायालयाच्या निकालानंतर अंजली पाटील (जान अंजली गुरू संजना) या तृतीयपंथीयाने पुन्हा आपला लढा उभारला आहे.
अंजली पाटील यांनी २०१५ च्या निवडणुकीतदेखील अर्ज भरला होता. त्या निवडणुकीत अंजली या फक्त ११ मतांनी पडल्या. मात्र नंतरच्या काळात त्यांनी जनसंपर्क कायम ठेवण्यावर भर दिला. सातत्याने लोकांशी संपर्क ठेवला. हेटाळणी, अवहेलना सहन करतदेखील शांत चित्ताने त्या काम करत राहिल्या. आणि यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरला.
मात्र तो अर्जदेखील रद्द करण्यात आला होता. त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांनी त्यांची साथ दिली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केली. या याचिकेनंतर त्यांना निवडणूक लढण्याची परवानगी मिळाली.
सध्या त्या वॉर्डात प्रत्येकाला भेटून आपला प्रचार करत आहे.
कोट - गेल्या निवडणुकीतदेखील मी उभी राहिले होते. आता पुन्हा या निवडणुकीत जिंकण्याच्या उद्देशानेच उभी राहिले आहे. गेल्या वेळचा पराभव विसरून आता नव्याने लढणार आहे. प्रचारदेखील सुरू आहे. - अंजली पाटील, तृतीयपंथी उमेदवार